साखरखेर्डा: साधारणत: १४ वर्ष वयोगटातील दोन अल्पवयीन मुलींनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात येत असलेल्या साखरखेर्डा पोलिस ठाण्यातंर्गत शेंदूर्जन शिवारात घडली. दरम्यान, यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून एका मुलीस वाचविण्यात ग्रामस्थांंना यश आले. या दोन मुलींसमवेत आणखी एक तिसरी मुलगी होती. मात्र तिने वेळेवर आपला विचार बदल घर गाठल्याने ती सुखरूप आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
साखरखेर्डा येथील एका हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात या मुली शिक्षण घेत होत्या. दरम्यान, या तिन्ही मुली १७ डिसेंबरला शाळेतून गायब होत्या. दुपारची सुटी झाल्यानंतर त्या माध्यान्ही घरी आल्या नाहीत. त्यामुळे चलबिचल सुरू झाली होती. शाळेतील काही मुलींनी दुपारी शिक्षकांना याची कल्पना दिली. तिघीही शाळेत आल्या होत्या. परंतू वर्गात न येताच त्या इमानाच्या दिशेने गेल्या असल्याची माहिती ही देण्यात आली. त्यांच्यासोबत शाळेतीलच दोन मुलेही गायब असल्याची माहिती समोर आली होती. ही बाब पाहता शाळेतील शिक्षक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले असता तिघींपैकी एक मुलगी ही घरी परतल्याचे समजले तर दोघी काळीपिवळीत बसून शेंदूर्जनच्या दिशेने गेल्याची माहिती शिक्षकांना मिळाली होती. प्रकरणी शाळेचे प्राचार्य संतोष दसरे यांनी पालकांना उपरोक्त माहिती देऊन शेंदुर्जनच्या दिशेने शिक्षक दोन्ही मुलींच्या शोधात गेले.
दरम्यान, चार वाजेच्या सुमारास दोन मुलींनी उत्तम शिंगणे यांच्या विहीरीत उडी मारल्याचे काही महिलांनी पाहिले. त्यांच्या शाळेच्या गणवेशावरून या मुली साखरखेर्डा येथील असल्याचे स्पष्ट होत होते. विहीरीत उडी घेणाऱ्या दोन्ही मुलींपैकी एकीने कसाबसा आपला जीव वाचवत विहीरीतील कपार गाठल्याने ती वाचली. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढत साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर डॉ. संदीप सुरुशे यांनी प्रथमोपचार करून तिला बुलडाणा येथे उपचारासाठी हलविले. दुसरीकडे शिक्षक, पोलीस, आणि ग्रामस्थांनी दुसर्या मुलीचा विहीरीत शोध घेतला असता ती मृतावस्थेत आढळून आली. सायंकाळी सहाच्या सुमारास तिचे पार्थिव विहीरीतून बाहेर काढण्यात आले. स्नेहा गवई असे या मृत मुलीचे नाव आहे.
दरम्यान, या दोन्ही मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याबाबत ठाणेदार स्वत: तपास करीत आहेत. नवव्या वर्गातील या मुलींना आत्महत्या का करावीशी वाटली? त्यांच्यासोबत आणखी कोण होते याबाबत सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.