देशाच्या घटनेने ओबीसी प्रवर्गाला अनेक हक्क दिलेले आहेत. परंतु त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी होत नाही. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेल्यावरही ओबीसींना त्यांचे न्याय हक्क मिळालेले नाहीत. ओबीसी प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आजपर्यंत राज्यपातळीवर तसेच देशपातळीवर अनेक आंदोलने झालीत. परंतु संपूर्ण यश ओबीसीच्या पदरात पडले नाही. संपूर्ण देशात जवळपास ५२ टक्के ओबीसींची लोकसंख्या आहे. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण मिळालेले आहे. काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या सूचना सरकारने स्वीकारलेल्या नाहीत. ओबीसींची एकजूट झाल्यास हे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. त्यासाठी देशभरातील ओबीसींची गणना झाली पाहिजे या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी ७ फेब्रुवारी, रोजी खामगांव येथे आयोजित केलेल्या महाअधिवेशनास उपस्थित रहा, असे आवाहन विदर्भ ओबीसी शिक्षक - प्राध्यापक महामोर्चाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सतोष आंबेकर यांनी एका पत्रान्वये केले आहे.
ओबीसी महाअधिवेशनास उपस्थित रहा - आंबेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:05 AM