मागील वर्षी लॉकडाऊन जाहीर केल्याने व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे अंमलबजावणी केल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यात आला होता. मात्र, मध्यंतरी नियमावलीमध्ये शीतलता आल्याने, कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याकरिता कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिल्याने, नियमावलीची हिवरा आश्रम येथे कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. गावकऱ्यांमध्ये करावयाच्या उपाययोजनांची जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच गावातील चार वार्डातील घंटागाडीद्वारे कचऱ्याचे संकलन करण्यात येणार आहे. हा कचरा संकलन करण्यासाठी दररोज सकाळपासून ते कचरा संपेपर्यंत गाडी गावांमध्ये फिरणार. या घंटागाडीद्वारे ओला कचरा व सुका कचरा संकलित करण्यात येऊन तो गावाबाहेर नेऊन टाकण्यात येत आहे. यामुळे गावातील अस्वच्छता नियंत्रित करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी घंटागाडीमध्ये कचरा टाकताना ओला कचरा व सुका कचरा असा वेगवेगळा टाकावा, जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोयीचे जाईल, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांना केले आहे.
कोट....
सद्यपरिस्थितीत गावांमध्ये एक घंटा गाडी सुरू केली असून, अतिरिक्त एका घंटागाडीची मागणी करण्यात येणार आहे.
- सदाशिव म्हस्के, ग्रामविकास अधिकारी, हिवरा आश्रम
कोट.....
कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रशासनाच्या नियमांचे पालन गावकऱ्यांनी करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे.
- प्राजक्ता नितिन इंगळे, सरपंच, हिवरा आश्रम