बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, या निवडणुकात महाविकास आघाडी एकत्र येते की या निवडणुका स्वतंत्रपणे सर्व पक्ष लढतात, याबाबत सध्या उत्सुकता आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवरची महत्त्वाची निवडणूक असून, ही निवडणूक राजकीय पक्ष त्यांच्या चिन्हावर लढत नाहीत; मात्र ग्रामपंचायत निवडणूक महाविकास आघाडी प्रसंगी एकत्रित लढण्यासंदर्भात विधीमंडळ अधिवेशन झाल्यानंतर निर्णय घेऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांकडून अद्याप त्यासंदर्भातील सूतोवाच करण्यात आलेले नाही; मात्र जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात असा निर्णय होऊ शकतो; परंतु ही बाब वरिष्ठ स्तरावरूनच ठरेल असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींपेकी मुदत संपलेल्या ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये जिल्ह्यात निवडणूक होत असल्याने ग्रामीण भागातील राजकारण सध्या तापलेले आहे. १५ डिसेंबर रोजी निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
स्थानिक गटातटांचे राजकारणमहाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता कमी असून, गावपातळीवरील गटातटाचे राजकारण या निवडणुकीत प्रभावी असते. त्यामुळे हे पक्ष शक्यतो ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्रित येण्याची शक्यता कमी आहे; मात्र परस्पर सहकार्य त्यांच्याकडून होऊ शकते.
ठरावीक पक्षांचा ग्रा. प. मध्ये दबदबा नाहीग्रामपंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाही. त्यामुळे ठरावीक पक्षांचा ग्रामपंचायतीमध्ये दबदबा आहे, असे म्हणता येणार नाही. ग्रामपातळीवरील राजकारण यात महत्त्वाचे असते. त्यामुळे स्थानिक प्रश्नांवर या निवडणुका होतील. ठरावीक पक्षांचे प्रभुत्व किंवा दबदबा ग्रामपंचायतीमध्ये फारसा दिसून येत नाही.
मोठ्या ग्रामपंचायतीत प्रयोगाची शक्यताजिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी एकत्र येऊन लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत मात्र प्रत्यक्ष विधीमंडळ अधिवेशनानंतर पक्षीय पातळीवर काय सूचना येतात यावर गोष्टी अवलंबून आहेत. प्रसंगी येत्या दोन ते तीन दिवसात अशी बैठक होऊ शकते.