जिल्हाभर १० दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन करण्यात आल्यामुळे ११ मे रोजी चैत्र अमावस्येला भरणारी यात्रा प्रशासनाच्या नियमामुळे रद्द करण्यात आली. या यात्रेला ७० वर्षांची जुनी परंपरा असून गावात श्री औंढेश्वर भगवान यांचे ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती असून या मंदिरातील महादेवाची पिंड शिळा श्रीक्षेत्र काशीनंतर येथेच पहावयास मिळते. महादेवाच्या पिंडीचे मुख उत्तरेकडे असून समोरच नंदीची मूर्ती आहे. दरवर्षी चैत्र अमावस्येला येथे यात्रा भरते. या महोत्सवात परिसरातील गावांमध्ये भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात. समस्त अंढेरावासीयांतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. या यात्रेला महादेव-पार्वती व गणपती यांच्या सोंगाची परंपरा लाभलेली आहे. यात्रेत सर्वच जाती-धर्मांचे भक्त दर्शनासाठी येतात व रेवडी-फुटाण्याच्या प्रसादाची उधळण करतात.
भाविक पायरीगणिक नारळ फोडतात. सासरी असणाऱ्या सर्वच लेकीबाळी यात्रेनिमित्त माहेरी येतात. याच दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा कार्यक्रम पार पडतो.
परंतु लाॅकडाऊन असल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी यात्रा महोत्सव रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.