लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : जामोद महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सन २०१९-२० चा आंबिया संत्रा बहार फळपीक विमा मिळाला नसल्याने संबंधित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जामोद येथील स्वयंचलीत हवामान केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची बाब समोर आली आहे. याबाबत आमदार डॉ.संजय कुटे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता २ नोव्हेंबर पर्यंत वास्तव स्थिती सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. एकीकडे सततचा पाऊस व नापिकी यामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. सुनगाव येथील ५० व जामोद येथील ११ संत्रा उत्पादकांनी सन २०१९- २० चा आंबिया संत्रा बहराचा फळ पिक विमा काढला होता. हा बहार बुडाला. शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघाला नाही. या पृष्ठभूमीवर सोनाळा व बावनबीर महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम मिळाली. परंतु, त्याला लागून असलेल्या जामोद महसूल मंडळातील संत्रा उत्पादक मात्र वंचित राहिले. स्वयंचलित हवामान तपासण्याचे जामोद येथील केंद्र गत काही महिन्यांपासून बंद आहे. त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसल्याची भिती व्यक्त होत आहे.