लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना गत तीन वर्षांच्या कार्यकाळात जन सामान्यांसाठी सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे आज देशात चैतन्याचे वातावरण असून सर्व घटकांचा विकास होत आहे. अशा कल्याणकारी योजनांमुळे देशातील शेवटच्या घटकाचा विकास होत आहे. शेतकऱ्यांना हवामानाची पूर्वसूचना देण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती विभागाच्यावतीने सहकार विद्या मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे ‘सबका साथ... सबका विकास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर, जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जि.प सभापती श्वेताताई महाले, सुनील गव्हाळे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक विलास ब्राह्मणकर, व्यवस्थापक राकेश जवादे, महेश पाटील, सचीन देशमुख, मोहन शर्मा, नंदू अग्रवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षेचे कवच उपलब्ध करून दिल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, पीक विमा योजनेत गतवर्षी दीड कोटी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या सरकारने गतवर्षी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून १६०० कोटी रूपयांची मदत दिली. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागण्याची गरज नाही. तसेच अन्य शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याचा दरही कमी आहे. पंतप्रधान सिंचन योजना केंद्र सरकारने अंमलात आणली असून, राज्यातील ५० टक्के अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी दिला आहे. गत काही दिवसांपासून राज्यामध्ये कर्जमाफीवरून अशांततेचे वातावरण होते. मात्र, राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देत त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले आहे. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, राज्यामध्ये ६ लाख मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती व आमदार आकाश फुंडकर यांनी केंद्र सरकारच्या दोन वर्षातील योजनांचा लेखा-जोखा मांडला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन देशमुख यांनी केले. माजी आमदार धृपदराव सावळे यांनी आभार मानले.
प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र - फुंडकर
By admin | Published: June 13, 2017 12:18 AM