लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तालुक्यातील गिरडा वन परिसरात मृतावस्थेत टाकण्यात आलेल्या ८० ते ९० कुत्र्यांचे प्रकरण आता वेगळे वळण घेण्याची शक्यता असून या कुत्र्यांवर विष प्रयोग करून त्यांना येथे आणून टाकण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सोमवारी या मृत कुत्र्यांपैकी सहा कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात येऊन त्याचा व्हीसेरा अमरावती तपासणीस पाठविण्यात येणार आहे.या प्रकरणी आठ सप्टेंबर रोजी वन विभागाचे कर्चमारी के. एन. तराळ यांच्या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्या पृष्ठभूमीवर ९ सप्टेंबर रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यातील तपासी अधिकारी शरद चोपडे, पोलिस कर्मचारी संजय वराडे, आरएफओ गणेश टेकाळे, वनरक्षक पी. एम. नारखेडे यांनी पुन्हा घटनास्थळ गाठून तेथे जमिनीत पुरण्यात आलेल्या कुत्र्यांपैकी सहा कुत्र्यांचे मृतदेह बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन केले. पाडळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डिगांबर जुंदळे यांनी हे शवविच्छेदन केले. मृत कुत्र्यांचा व्हीसेरा अमरावती येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर या कृत्र्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र सुत्रांच्या अंदाजानुसार या कुत्र्यांवर विषप्रयोग करून त्यांना गिरडा परिसरात आणून टाकले होते. सहा सप्टेंबर रोजी कुत्र्यांचे मृतदेह डिकंपोज होण्यास प्रारंभ झाल्यानंतर त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. दरम्यान, हे ही कुत्री मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन परिसरातील असल्याचा आरोप बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
गिरड्यातील ‘त्या’ मृत कुत्र्यांचे शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 1:57 PM