हिंगणे गव्हाड (ता.नांदुरा, जि. बुलडाणा) : गावातील विद्यार्थी घडविणारे सेवानवृत्त मुख्याध्यापक भावगीर देवगीर गिरी यांचे निधन झाले. निधनानंतर त्यांची तेरवी न करता, आप्तांनी गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टॅकर आणि पाईपलाईन करून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. येथील सेवानवृत्त मुख्याध्यापक भावगीर देवगीर गिरी यांचे १२ डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या तेरवीच्या कार्यक़्रम न करता मुख्याध्यापक गिरी यांच्या पत्नी ग.भा.सुमनबाई भावगीर गिरी यांनी गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाच हजार लिटर क्षमता असलेला एक लाख किमतीचा पाणी टँकर गावाला दान दिला आहे. सोबतच स्वत:च्या शेतातून गावातील लोकांना पाईपलाईनव्दारे मोफत पाणी पुरवठा करण्याचा संकल्प केला. आज २५ डिसेंबर रोजी पाईपलाईन व टँकरचा लोकार्पण सोहळा माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम वडोदे गुरुजी हे होते. तसेच प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे, माजी जि.प.सभापती सुरेश वनारे, सेवानवृत्त आरोग्य उपसंचालक डॉ.पी.एल.भारती, कु.सविता चव्हाण, प्रसाद पाटील, सौ.अर्चनाताई डुकरे, रघुनाथ भारती, भागवत पाटील, रामभाऊ अवचार, समाधान वाकोडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना माजी आ.सानंदा यांनी गिरी गुरूजींच्या कार्याचा गौरव करून सुसंस्कृत व सामाजीक बांधीलकीची पिढी घडविण्यासाठी त्यांचे योगदान असल्याचे नमुद केले.
तेरवीचा खर्च टाळून गावातील पाणी टंचाईवर मात !
By admin | Published: December 25, 2014 11:55 PM