खामगाव : भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या पवित्र नवरात्रोत्सवात वाघाच्या ‘सवारी’ने आदिशक्तीचा जागर करण्यात येत आहे. पुरातन कलेसोबतच पिढीजात परंपरेची जोपासणा करण्यासाठी शेगावातील काही युवक प्रयत्नशील आहेत. शेगाव आणि परिसरात नवरात्रोत्सवात गत १६ वर्षांपासून आदिशक्तीचा जागर करीत,पारंपारिक वाद्याच्या आवाजावर ठेका धरीत अनेकांचे मनोरंजनही या युवकांकडून केल्या जात आहे.
कालाच्या ओघात गोंधळी, वासुदेव, पोतराज आणि वाघाच्या सवारी लुप्त पावत असल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण भागासह ग्रामीण वस्ती बहुल शहरांमध्ये पुरातन कला आणि पिढीजात परंपरांची जोपासना करण्यासाठी काही जणांचा कृतीशील पुढाकार राहतो. शेगाव शहरातील खळवाडी परिसरातील बम्लेश्वरी मंडळाचे पदाधिकारी वाघाच्या ‘सवारी’च्या माध्यमातून कलेची जोपासना करीत आहेत. यंदाच्या नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर करण्यासाठी विवेक बावस्कर, लखन तायडे, दर्शन सोनोने, प्रसाद अंभोरे, अक्षय अंभोरे, आकाश खंडारे, वीर जाधव, नंदू गोहरे आणि रवी तायडे वाघ बनले आहेत.
डफड्याच्या आवाजावर नृत्याचा फेर!- नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर करताना चौकात तसेच गर्दीच्या ठिकाणी डफड्याच्या आवाजात लयबध्द ठेका धरीत वाघाच्या ‘सवारीतील’ युवकांकडून अनेकांचे मनोरंजन केल्या जात आहे.
दरवर्षी बदलतात ‘वाघ’- वाघाच्या सवारीच्या पुरातन प्रथेची जोपासना करताना वरिष्ठांच्या पुढाकारातून ‘वाघां’ची निवड केली जाते. यामध्ये परिसरातील लहान मोठ्या बालकांचा समावेश राहतो. अनुभवी ‘वाघ’ नवीन युवक आणि बालकांना नृत्य तसेच ठेक्याचे प्रशिक्षण देतात. दरवर्षी हे देवीचे वाघ बदलण्यात येतात.