बुलडाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त साकारण्यात येणाऱ्या १२७ फूट लांबीच्या भव्य रांगोळीचे बुधवारी स्केच तयार करण्यात आले. तर १२ एप्रिल रोजी या भव्य रांगोळीत रंग भरणीला सुरुवात झाली. संपूर्ण रांगोळी १३ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती प्रसिद्ध रांगोळीकार कृष्णा सासवडकर यांनी दिली. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात व उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी १२७ वा जयंतीमहोत्सव असून देश व जगभरात मोठ्या आनंदात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने १४ एप्रिल रोजी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील अल्पसंख्यांक शिक्षण-प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मच्छी ले-आऊटमधील विशाल प्रांगणात १२७ फुट रांगोळीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सतत तीन दिवस परिश्रम घेऊन ही भव्य रांगोळी पूर्ण करण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सकाळी ११ वाजेपासून रांगोळी काढण्यास सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत बाबासाहेबांच्या १२७ फुट लांब रांगोळीचे स्केच पूर्ण झाले. तर छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या मुखवट्याची रांगोळी जवळपास पूर्ण झाली. गुरुवारी सकाळी बाबासाहेबांच्या भव्य रांगोळीत रंग भरणीला सुरुवात करण्यात आली. दुपारपर्यंत जवळपास अर्धे रंगकाम पूर्ण झाले. बाबासाहेबांची १२७ फुट रांगोळी साकारण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने नागरिक रांगोळी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. बुधवारी स्केच तयार करुन रांगोळीत रंग भरण्यास सुरु केल्याचे रांगोळीकार सासवडकर यांनी सांगितले. यावेळी शरद हिवाळे, गजानन गवई, राजु मोरे, बालु तायडे, राहुल सोनोने, प्रदीप जाधव, गोपाळ आराख, किरण मोकळे, अमोल हिवाळे, नितीन काळे, सागर जाधव, तुषार वाठोरे, राहुल गवई, प्रदीप मोरे यासह मच्छी ले-आऊटमधील नागरिक उपस्थित होते.
सेल्टी पॉर्इंट ठरणार आकर्षण
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १२७ फुट रांगोळी साकारण्यात येणार आहे. बुलडाण्यात पहिल्यांदाच हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे बुलडाणेकरांना साक्षीदार होता यावे यासाठी रांगोळी साकारलेल्या संस्थेच्या प्रांगणात सेल्फी पॉर्इंट उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष दीपक मोरे यांनी दिली. हा सेल्फी पॉर्इंट बुलडाणेकरांसाठी आकर्षण ठरेल.