जिल्ह्यातील सातही आगारांचा आढावा घेतला असता खामगाव व बुलडाणा, मलकापूर व चिखली आगार वगळता इतर आगारांत प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे समोर आले आहे. टाळेबंदीपूर्वी दिवसाला ३९० शेड्युलद्वारे ३ हजार ५०० बसफेऱ्या सुरू होत्या. सुटीच्या दिवशी यामध्ये काही प्रमाणात कपात करण्यात येत होती. याबरोबरच बुलडाणा-नागपूर, बुलडाणा-पुणे, चिखली-मुंबई, मेहकर-पुणे, मलकापूर-पुणे अशा पाच रातराणी बस सुरू होत्या. या बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. आता मात्र २१० शेड्युलद्वारे दिवसाला केवळ ५७६ बसफेऱ्या सुरू आहेत. जिल्ह्यातील सात आगारांपैकी एकाही आगारातून सध्या एकही रातराणी बस सुरू नाही. या बससेवेला सध्या प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान होत असून, येत्या काळात असेच सुरू राहिल्यास आगारातील चालक व वाहकांसह इतरांचे वेतनही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या एसटीच्या किती फेऱ्या सुरू आहेत : ५७६
रातराणी किती : ००
वाहक : २१०
चालक : २१०
ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी
बुलडाणासह खामगाव, शेगाव, मलकापूर व जळगाव जामोद येथून नागपूर, पुणे व मुंबईसह गुजरातमधील सुरत तर मध्यप्रदेशातील इंदौर येथे सायंकाळी खासगी ट्रॅव्हल्स निघतात. सध्या ट्रॅव्हल्सचे भाडे हे ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत आहे. एसी, नॉन एसी, स्लीपर कोच आराम बसमध्ये जागा मिळावी, यासाठी अनेक जण आधीच बुकिंग करून ठेवतात. यातून अनलॉक झाल्यानंतर घरी परतलेले पुण्या-मुंबईत जाण्यासाठी ट्रॅव्हल्सचा आधार घेत आहेत. यातून या बसला गर्दी अधिक आहे. दुसरीकडे एसटी बसमध्ये जागा असूनही प्रवासी प्रवास करणे टाळत आहेत. प्रवासी खासगी आराम बसचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्ह्यातून सध्या एसटी रातराणी बससेवा बंद ठेवण्यात आली आहे.
प्रवाशांचा प्रतिसादच शून्य
एसटी महामंडळाच्या सातही आगारातून सध्या मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. यातही प्रमुख मार्गावरच्या फेऱ्यांचा समावेश आहे. खामगाव येथून जळगाव, धुळे, औरंगाबाद, अकोला, अमरावती व नागपूर येथे बसफेऱ्या सुरू आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने काही आगारातून लांब पल्ल्याच्या बस बंद आहेत. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये बससेवेला प्रवाशांचा पूर्वीप्रमाणेच प्रतिसाद मिळणार असून, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनापूर्वी जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मलकापूर व मेहकर आगारातून रातराणी बस सोडण्यात येत होत्या. मात्र, सध्या प्रवाशांचे बुकिंगच मिळत नसल्याने या बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत रातराणी बससेवा सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून या सेवेचा लाभ घ्यावा.
-ए. यू. कच्छवे,
विभागीय वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.