नानासाहेब कांडलकर / जळगाव जामोद (बुलडाणा)ग्रामीण भागासाठी व शेतकर्यांसाठी असणार्या शासकीय योजना संबंधितांपर्यंंत पोहचविण्याची जबाबदारी पंचायत समिती व कृषी विभागाची असते. जळगाव जामोद तालुक्यात या विभागांमध्ये कर्मचार्यांचा मोठा अनुशेष असल्याने जनतेला योजनांचा लाभ पुरविण्यास बरेचदा विलंब होतो. त्यामुळे कधी कधी जनता व अधिकारी यांच्यामध्ये संघर्षाचीही स्थिती उद्भवते.जळगाव जामोद येथील कृषी विभागाचे कार्यालय चक्क एका गोदामात थाटले आहे. या कार्यालयातील अत्यंत महत्वाचे तालुका कृषी अधिकार्याचे पद गत तीन वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे प्रभारी अधिकार्यांकडून कामकाज सुरू आहे. तसेच या कार्यालयातील सहाय्यक अधिक्षक, तीन कनिष्ठ लिपीक, दोन अनुरेखक, शिपाई व चौकीदार अशी आठ पदे रिक्त आहेत. परिणामी शेतकर्यांची कामे वेळेवर होत नाही. मंडळ कृषी अधिकारी एक या कार्यालयातील सुध्दा चार पदे रिक्त आहेत. यामध्ये कृषी पर्यवेक्षक, दोन कृषी सहाय्यक व अनुरेखक यांचा समावेश आहे. तर मंडळ कृषि अधिकारी दोन या कार्यालयातील मंडळ कृषी अधिकार्यांचेच पद रिक्त आहे. तसेच या कार्यालयातील अनुरेखक व शिपाई ही दोन पदे सुध्दा रिक्त आहेत. चार अनुरेखक पदांपैकी एकही अनुरेखक नाही. कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अधिक्षकाचे पद हे महत्वाचे असते ते सुध्दा रिक्त आहे. सदर पदे रिक्त असल्याने शेतकर्यांची कामे वेळेत होत नाही तसेच शासनाच्या योजना शेतकर्यांपर्यंंत पोहचण्यात विलंब होतो. या रिक्त पदांबाबत आ.डॉ.संजय कुटे यांनी एक वर्षापूर्वी धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर काही पदे भरण्यात आली. परंतु काही कर्मचारी नवृत्त झाल्याने व काहींच्या बदली झाल्यामुळे कर्मचार्यांचा अनुशेष पुन्हा वाढला आहे. तालुका कृषी अधिकार्याचे पद भरण्याची गरज निर्माण झाली आहे.तसेच पंचायत समिती मार्फत ग्रामीण भागातील सर्व योजना राबविल्या जातात. जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकार्यांची दोन्ही पदे भरली असली तरी ग्रामविकास अधिकार्यांची आठ पैकी च क्क पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील मोठय़ा गावांचा कारभार वार्यावर असल्याचे चित्र आहे. ग्रामसेवकांची सुध्दा सहा पदे रिक्त आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभार अन्य ग्रामसेवकांना सांभाळावा लागतो. ग्रामसेवकांच्या रिक्त पदांची स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत सुधारली आहे. सहाय्यक प्रशासन अधिकारी यांची प्रतिनियुक्ती जिल्हा परिषद बुलडाणा येथे झाल्याने ते पद सुध्दा रिक्त आहे. याशिवाय कृषी अधिकारी सामान्य, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी सां िखकीय, विस्तार अधिकारी उद्योग ही पदे रिक्त आहेत.
रिक्तपदांचा अनुशेष वाढला
By admin | Published: December 13, 2014 12:17 AM