नायगाव दत्तापूर : येथील हनुमान मंदिरात पारायण व महाप्रसादाची परंपरा गत १६९ वर्षांपासून जपली जात आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी येथे लोकवर्गणीतून महाप्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता झाली. त्यानंतर उरलेल्या धान्याची दुसऱ्या दिवशी २० सप्टेंबरला हार्राशी करण्यात आली. या वेळी भाविकांनी एक किलो मिठाची थैली २२०१ रुपयांत, तर अर्धा किलोसाठी ११०० रुपये देऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हातभार लावला.
येथील गावाचे ठाण म्हणून ओळख असलेल्या हनुमान मंदिरात सर्व जातीधर्मीयांच्या एकात्मतेचे दर्शन होते. या मंदिरात फार पूर्वीपासून दरवर्षी आषाढी एकादशीला एक महिना पारायण करण्याची परंपरा सुरू आहे. त्याच ठिकाणी गणेशाची स्थापना व विसर्जनावेळी जोड अमृत योग म्हणून सर्व गावकऱ्यांची गहू, तांदूळ आणि तूरडाळ वर्गणी जमा करून संपूर्ण गावाचा १० क्विंटलचा महाप्रसाद येथे होतो. त्यात सर्व गावकरी आनंदाने सहभागी होत असतात. परंतु मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी व विकास करण्यासाठी ६ नवयुवक मंडळी प्रयत्न करीत आहेत. मंदिराचे पुजारी म्हणून येथील गजानन तुकाराम निकम हे नि:शुल्क आपली अखंड सेवा देत आहेत. १६९ वर्षांची जुनी परंपरा आजही जोपासत पारायणाची सांगता करण्यात आली. गणरायाची मिरवणूक टाळाच्या गजरात व मृदंगाच्या निनादात काढण्यात आली. महिलांनी अंगणात सडे, रांगोळी काढत फुलांचा वर्षाव केला. संपूर्ण दिवस भक्तिमय होऊन १९ सप्टेंबर रोजी १० क्विंटलचा भंडारा सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून पार पडला.
अशी झाली हार्राशी
२० सप्टेंंबर रोजी उरलेल्या धान्याची दुसऱ्या दिवशी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हार्राशी पार पडली. यात मंदिराचे धान्य घेण्यासाठी गावकऱ्यांतून चढाओढ होत असते. त्यात उरलेल्या धान्यातून एक किलो मिठाची थैली येथील विजय दत्तात्रय निकम यांनी २२०१ रुपयांत घेतली तर अर्धा किलो मिठाची थैली ११०० रुपयांपर्यंत बऱ्याच मंडळींनी घेतली. बाकी उरलेले धान्यही बाजाराच्या पाच पट भावांत विकत घेऊन मंदिराला हातभार लावण्याचे काम दरवर्षी येथे गावकरी मोठ्या आनंदाने करीत आहेत.