खामगाव (बुलढाणा): कुरिअर सर्विसचे पैसे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची ६० लाख रुपयांची बॅग खासगी ट्रॅव्हल्स बसमधून लंपास करणाऱ्या एका चोरट्यास नांदुरा पोलिसांनी मध्य प्रदेशात बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी पाच दिवस मध्य प्रदेशात ठाण मांडून चोरट्यास चोरीच्या पैशांसह अटक केली आहे. मुंबई येथील एका कंपनीच्या अकोला शाखेचे मॅनेजर विक्रमसिंह स्वरूपसिंह मांगलियार यांच्या हाताखाली कुरिअर सर्व्हिसचे काम करणारे प्रमोदसिंह मोहनसिंह परमार (३०) ही व्यक्ती ९ फेब्रुवारी रात्री एका ट्रॅव्हल्सने अकोला येथून ६० लाख रुपये घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाली होती.
दरम्यान, खासगी बस वडनेर भोलजी गावानजीक हॉटेलसमोर थांबली. यावेळी परमार खाली उतरले. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने बसमधून त्यांची ६० लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. तसेच, साथीदारांसह एका कारने पसार झाला, काही अंतरावर जाऊन चोरट्यांनी बॅगमधून पैसे काढून घेतले. तसेच, जीपीएस मशीन आणि बॅग फेकून दिली. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. या चोरट्यांच्या मागावर नांदुरा पोलिस मध्य प्रदेशात पोहोचले. पोलिसांनी वेगवेगळ्या वेशभूषेत राहून चोरट्याची माहिती मिळवली.
१५ फेब्रुवारी रोजी रात्री धार जिल्ह्यातील बेडवा येथून चोरटा अजय मुकेश उपाध्याय (२२) याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या जवळून पोलिसांनी ४९ लाख रुपये जप्त केले. त्याला नांदुरा पोलिस स्टेशनला आणले आहे. पोलिस त्याच्या इतर साथीदारांच्या शोधात आहेत. नांदुराचे ठाणेदार विलास पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक नागेश जायले, नापोकॉ विक्रम राजपूत, पोकॉ विनायक मानकर, विनोद भोजने यांनी ही कामगिरी केली.