बुलडाणा : जिल्ह्यातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये काेराेना महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या ३६ बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली आहे. ही सेवा कायम सुरू ठेवण्यासाठी बीएएमएस डाॅक्टरांनी १४ जून राेजी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांत एमबीबीएस डाॅक्टर मिळत नसल्याने बीएएमएस डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आली हाेती. जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून काेराेना संसर्ग सुरू झाला हाेता. या काळात कंत्राटी असलेल्या बीएएमएस डाॅक्टरांनी जिवाची पर्वा न करता सेवा दिली. यादरम्यान अनेक डाॅक्टरांना काेेराेनाचा संसर्ग झाला हाेता. काहींची प्रकृती गंभीर बनली हाेती, तरीही या डाॅक्टरांनी अविरत सेवा दिली. केंद्र शासनाने एमबीबीएस डाॅक्टरांना बंधपत्रित सेवा देणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे, प्रशासनाला आता एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध असल्याने बीएएमएस डाॅक्टरांची सेवा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे सेवा कायम ठेवण्याची मागणी बीएएमएस डाॅक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
माजी आमदार डाॅ. शशिकांत खेडकर यांच्या नेतृत्वात डाॅक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी डॉ किशोरकुमार बीबे, डॉ. प्रीतम ठाकूर, डॉ. गणेश बोरकर, डॉ. स्वाती आघाव, डॉ. पूनम शिंगणे आदी उपस्थित हाेते.