बीबी : सिंदखेड राजा तालुक्यातील मुंबई-नागपूर राज्य महामार्गावरील राहेरी गावाजवळी खडक पूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाला असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेहकर ते जालना मार्गावरील शेकडो छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मेहकर ते जालना मार्गावर लाेणार तालुक्यातील काही गावे आहेत. या गावांतील छाेट्या व्यवसायिकांनी महामार्गावर हाॅटेल व इतर दुकाने सुरू केली आहेत. आधीच कोरोनामुळे व्यावसायिकांना बँक, फायनान्स, खासगी सावकारांकडून कर्ज काढावे लागले आहे. कसेबसे कोरोनाचे नियम शिथिल होताच व्यावसायिकांनी आपली दुकाने, हॉटेल, धाबे, पानपट्टी ,गॅरेज, किराणा दुकान ,मोबाईल शॉपी, फळे विक्री अशी विविध प्रकारची दुकाने पुन्हा सुरू केली. या व्यावसायिकांचे जड वाहनचालक मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत.मात्र मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आल्याने या दुकानदारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची तसेच बेराेजगार झालेल्या व्यावसायिकांना मदत देण्याची मागणी सुनील केंद्रे यांच्यासह संदीप खुळे ,बाबाभाई, प्रदीप बनकर, गोपाल काळे, गुलाब सोळंके, संतोष केंद्रे, राम राठोड, शिवानंद ढाकणे, सुनील तळेकर आदींनी केली आहे.
काेट
शासनाने नदीवर पर्यायी लोखंडी पुलाची व्यवस्था करून वाहतूक सुरळीत करावी. त्यानंतर नादुरुस्त झालेल्या पुलाचे काम करण्यास सुरुवात करावी. तसेच व्यावसायिकांवर आलेली बेरोजगारी थांबवावी.
डाॅ. सुनील केंद्रे, माजी सभापती, पंचायत समिती, लोणार