खामगाव : अवर्षणामुळे खरीप हंगाम हातचा गेलेल्या खामगाव तालुक्यातील शेतकर्यांना लवकरच १८ कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने तहसील कार्यालयाने जिल्ह्यातील ३२ हजार शेतकर्यांची माहिती व बँक खाती अद्ययावत केली आहे. दरम्यान, २१ जानेवारीपर्यंत शेतकर्यांच्या याद्यांवर आक्षेप मागविण्यात आले होते. प्राप्त आक्षेपांच्या अनुषंगाने आता जवळपास कार्यवाही पूर्ण झाली असून, आठवड्याअखेरीस थेट शेतकर्यांच्या खात्यात दुष्काळी पॅकेजची रक्कम जमा करण्यात येणार आहे. १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयाला दुष्काळी पॅकेज अंतर्गत तालुक्यातील शेतकर्यांना अनुदान वाटपाबाबतची रक्कम प्राप्त झाली होती. त्यानुसार शेतकर्यांच्या याद्या अद्ययावत करून ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय स्तरावर या याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. सोबतच या याद्यांवर शेतकर्यांचे व अन्य नागरिकांचे आक्षेपही मागविण्यात आले होते. तालुक्यातून काही आक्षेप तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यांची छाननी करून या मदतवाटपाच्या याद्या आता तहसील कार्यालयाने अद्ययावत केल्या आहेत. जिल्ह्यात सलग दोन वर्षांपासून अवर्षणाची स्थिती आहे. गेल्या वर्षीही शेतकर्यांना अवर्षणापोटी २३९ कोटी रुपयांचे दुष्काळी पॅकेज मिळाले होते. त्यानंतर आता २0१५-१६ या वर्षामध्येही जिल्ह्यात दुष्काळ पडल्याने शेतकर्यांचे खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यासाठी ३२८ कोटी रुपयांचे दुष्काळी पॅकेज मिळाले असून, त्यातील १८३ कोटी ८३ लाख रुपयांची मदत पहिल्या टप्प्यात प्राप्त झाली आहे. त्यापैकी १८ कोटी रुपये हे एकट्या खामगाव तालुक्यात वितरित करण्यात येणार आहे. ३0 जानेवारीपर्यंंत ही मदत शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी वगळून ही मदत दिली जाणार आहे. त्यामुळे ४२ हजार शेतकर्यांना प्रत्यक्षात ही मदत मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
३२ हजार शेतक-यांची बँक खाती अपडेट!
By admin | Published: January 25, 2016 2:20 AM