मोताळा (बुलढाणा): नांदुरा तालुक्यातील शेंबा येतील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यामधील १३ लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना १० मार्च रोजी पहाटे उघडकीस आली. राखेडी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.नांदुरा तालुक्यातील शेंबा येथे ही बँक असून त्याला लागूनच एटीएम आहे. बँकेला तीन दिवसांची सुटी असल्याने ७ मार्च रोजी एटीएममध्ये २० लाख रुपये टाकले होते. त्यापैकी १३ लाख २२ हजार रुपये एटीएम मध्ये शिल्लक होते. दरम्यान १० मार्च रोजी पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी नांदूऱ्याकडून अज्ञात चोरटे चारचाकी वाहनातुन आले आणी त्यातील एका चोरट्याने एटीएम मध्ये प्रवेश केला.
त्यानंतर सहा मिनिटांनी सर्वप्रथम त्या चोरट्याने कलरचा स्प्रे कॅमेऱ्यावर मारला आणी त्यानंतर सायरनची वायर कापली. त्यामुळे कॅमेरे बंद झाले. नंतर चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले. त्यावेळी एटीएम वरील सेन्सरच्या सहाय्याने एटीएमच्या सुरक्षेवर असणारी एएनजी इंडीया लिमिटेडची दिल्ली येथील सुरक्षा टिम अलर्ट झाली आणी त्यांनी तात्काळ शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बोराखेडी पोलीसांशी संपर्क साधण्यात आला. परंतू तोवर चोरट्यांनी एटीएममधील १२ लाख २२ हजारांची रोख रक्कम घेऊन पलायन केले.
पोलीसांचा ताफा घटनास्थळी पोहोचण्याच्या पाच मिनिटापूर्वी चोरट्यांनी तेथून पळ काठला होता. घटनास्थळी ठाणेदार सारंग नवलकार, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजवंत आठवले, एलसीबीचे अशोक लांडे, एसडीपीओ सुधीर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी घटनास्थळाची पहाणी केली. याप्रकरणी शाखाव्यवस्थापक पवनकुमार अनिलकुमार पुरील यांनी तक्रार दिली आहे.
चोरट्यांच्या शोधात तीन पोलीस पथके रवानाया प्रकरणातील चोरट्यांच्या शोधासाठी बोराखेडी पोलिस ठाण्याचे दोन व एक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले असून ते या चोरट्यांचा शोध घेत आहे. एक पथक मध्यप्रदेश सिमेपर्यंतही जाऊन आले. पण चोरट्यांचा शोध लागला नाही. चोरट्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कलरचा स्प्रे मारत सायरनची वायर कापली. त्यानंतर गॅस कटरने एटीएम फोडले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. यापूर्वीही दोन ते तीनवेळा शेंबा येथील या एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी चोरट्यांना मात्र यश आले नव्हते.