लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीची घोषणा करून महिना उलटला, तरी बँकांना अद्याप यासंदर्भात कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे बँकांमध्ये शेतकऱ्यांना टोलवून लावणे सुरूच असून, शेतकरी चकरा मारुन हैराण झालेले आहेत.१ जूनपासून शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप सुरू केल्याने शासनाने ११ जून रोजी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. तर सरसकट कर्जमाफीलाही तत्त्वत: मंजुरी दिली होती. यानंतर २४ जून रोजी सरसकट कर्जमाफीची घोषणा करताना दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, याकरिता काही निकष लावण्यात आलेले असल्याने कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार व कोणाला नाही, यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे याविषयी विचारणा करण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये जात आहेत; परंतु बँकांकडून आम्हाला कर्जमाफीबद्दल कोणताही आदेश शासनाकडून आलेला नाही, असे म्हणून त्यांना चक्क टोलवून लावले जात असल्याचे दिसून येते. खामगावातील भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेत, तर चक्क ‘शेतकरी कर्जमाफीविषयी चौकशी करू नये’ असा फलकच लावण्यात आला. कर्जमाफीसंदर्भात आतापर्यंत बँकेला एकही आदेश प्राप्त झाला नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने ‘लोकमत’ला दिली, असा सगळा सावळा गोंधळ असल्यामुळे शेतकरी बँकांमध्ये चकरा मारुन हैराण होत आहेत. शासनाने शेतकऱ्यांची पेरणीची गरज लक्षात घेऊून त्यांना १० हजार रुपयांचे तत्काळ कर्ज देण्याचा आदेशही याअगोदरच दिला होता; परंतु त्यावरही अंमलबजावणी झालेली नाही. शासनाचे तळ्यात-मळ्यात! कर्जमाफीसंदर्भात शासनाचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नसून, तळ्यात मळ्यात सुरुच आहे. कर्जमाफीसंबंधी परिपत्रकात दोन-तीन वेळा फेरबदल केल्यानंतरही आता आणखी कर्जमाफीसाठी नव्या गाइडलाइनचा विचार राज्य सरकार करीत आहे. त्यामुळे शासनाकडून कर्जमाफीच्या निर्णयासंदर्भात पोरखेळ सुरु असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांमध्ये वाढतोय संताप!शासनाची धरसोडीची भूमिका व प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडचणींचा डोंगर आडवा येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. शासनाने आपल्याला कर्जमाफीच्या नावाखाली फसविले असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कर्जमाफीसाठी बँकांची टोलवाटोलवी सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 12:52 AM