बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दाताळा सेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे हा अजूनही पोलिसांच्या हाली लागलेला नाही. त्याला पकडण्यासाठी मलकापूर पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले असतानाच प्रकरणातील पीडित महिलेला स्थानिक ग्रामसेवा सोसायटीने ५० हजार रुपयांचे पीककर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे सेंट्रल बँकेनेही पीडित महिलेला ६५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. पीडित महिलेला समाजकल्याण निधीतूनही ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.दरम्यान, दोन्ही आरोपींविरोधात सेंट्रल बँकेकडून विभागीय चौकशी सुरू केली जात असल्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या मुद्द्यावर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्याशीही त्यांच्या कक्षात दुपारी पावणे दोनच्या सुमारास चर्चा केली. मात्र त्याचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासन गंभीर आहे.
पोलिस हिवसेच्या मागावरसेंट्रल बँकेचा शाखाधिकारी राजेश हिवसे सध्या नागपूर परिसरात असल्याची कुणकून त्याच्या शोधासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकाला लागली असून, या प्रकरणात सायंकाळपर्यंत मोठी घडामोड होण्याची शक्यता पोलिसातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.शिपायाला मंगळवारी न्यायालयात हजर करणारया प्रकरणात मूर्तिजापूर येथून ताब्यात घेण्यात आलेला सेंट्रल बँकेच्या दाताळा शाखेचा शिपाई मनोज चव्हाण (रा. अकोला) याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्याला बीपीचा त्रास होत असल्याने अटक झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तो बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली असून, त्याला २६ जून रोजी न्यायालयासोर प्रसंगी हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
पीडितेचा कर्ज घेण्यास नकार प्रकरणातील पीडित महिलेला सेंट्रल बँकेने ६५ हजार रुपयांचे पीककर्ज मंजूर केले आहे. त्या संदर्भात जिल्हास्तरावरून बँकेचे एक अधिकारी हे पीडित महिलेच्या घरी जाऊन आले असून ६५ हजार रुपये पीककर्ज मंजूर करण्यात आले असल्याचेही या कुटुंबास सांगण्यात आले आहे; मात्र पीडित महिलेने आता सेंट्रल बँकेचे कर्ज घेण्यास नकार दिला असल्याची माहिती सेंट्रल बँकेच्या सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे स्थानिक ग्रामसेवा सोसायटीकडून पीडित महिलेला जवळपास ५० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सोबतच या संपूर्ण प्रकरणाच्या पृष्ठभूमिवर सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक नरेंद्र मलालीकर हे सायंकाळपर्यंत बुलडाण्यात दाखल होत आहे.