लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : पीक विम्याची मुदत शासनाने वाढवूनही बँकांना आदेश प्राप्त न झाल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहत आहेत. सदर आदेश तत्काळ बँकांना द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दिनकरराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
सिंदखेड राजा तालुक्यात २५ हजारांहून अधिक शेतकरी असून, राष्ट्रीयीकृत बँका आणि जिल्हा सहकारी बँकांना पीक विमा स्वीकारण्याची तारीख ३१ जुलै देण्यात आली होती; परंतु सर्वच बँकांना आदेश हे उशिरा मिळाल्याने बँकांनी २९ ते ३१ जुलैपर्यंत म्हणजे तीन दिवसच अर्ज स्वीकारले. काही बँकांनी तर फक्त ३0 आणि ३१ जुलैलाच अर्ज स्वीकारले. १ ऑगस्टला नवीन आदेश काढून बिगर कर्जदार शेतकर्यांसाठी ४ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली. त्या आदेशात नमूद केले आहे, की केवळ ऑनलाइन अर्ज सादर करावेत. ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने आणि अर्ज कसे भरावेत, याचे ज्ञान शेतकर्यांना नसल्याने त्यांना नेट कॅफेवर धाव घ्यावी लागत आहे. नेटसेवा सर्वच जाम झाल्यामुळे नेटकॅफे सेंटर संचालकांचे हात टेकले आहेत. दिवसभर प्रतीक्षा करूनही अर्ज ऑनलाइन स्वीकारल्या जात नसल्याने शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. या संपूर्ण पीक विमा प्रकरणाची दखल घेऊन बँकेमार्फत अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी दिनकरराव देशमुख यांनी केली आहे.
शासनाच्या सुधारित आदेशानुसार ४ ऑगस्ट ही बिगर कर्जदार शेतकर्यांना दिली असून, त्यांनी कॅफे सेंटरवरुन अर्ज भरावेत, असा आदेश आहे.- रवी राठोड,तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा.