लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहेत. शेतकरी बी-बियाणे व खते खरेदीच्या तयारीला लागले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेकडून अडचण येऊ नये, शेतकऱ्यांना सर्वच बँकेमधून वेळेवर पीक कर्ज मिळावे, यासाठी तहसीलदार संतोष काकडे यांनी सर्व राष्ट्रीयीकृत बँक व्यवस्थापकांना शेतकऱ्यांकडून सध्या कोणतीच वसुली अथवा कपात करु नये, असे सूचना करणारे पत्र १५ मे रोजी दिले.जिल्ह्याभरात कृषी विभागाकडून खरीप पेरणीसाठी नियोजन केले असून, यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. मान्सूनचे लवकरच आगमन होणार असल्याचे संकेत मिळल्यामुळे पेरणीसाठी खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे खते, बियाणे व इतर शेती साहित्य खरेदीसाठी सर्वच शेतकरी विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडे पीक कर्जाची मागणी करीत आहेत. परंतु अनेक शेतकऱ्यांकडे मागील तसेच चालू वर्षाचे कर्ज थकीत असतात. त्यामुळे बँकेकडून शेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांना मिळणारे पीक विमा व इतर शासकीय अनुदान संबंधित बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. परंतु शेतकऱ्यांकडे मागील थकीत कर्ज असल्याने सर्वच बँकवाले शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेऊन कर्ज खात्यात जमा करत आहेत, तर अनेक खात्यांना बँकवाल्यांनी होल्ड लावले आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी पीक विम्याची रक्कम व इतर अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही. पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्यांना सध्या पैशाची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळून त्यांना खते व बियाणे खरेदी करता यावे, यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कोणत्याच शेतकऱ्यांचे खाते होल्ड करु नये, तसेच त्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करु नये, अशा सूचना तथा पत्र तहसीलदार संतोष काकडे यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले होते आंदोलन!खरिपाच्या पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड करु नये, तसेच कर्ज खात्यात रक्कम जमा करु नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितू अडेलकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले, अमोल धोटे, विशाल मेटांगळे, सैयद इस्माईल यांनी डोणगावच्या स्टेट बँकेत आंदोलन केले होते.
बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कम कपात करू नये!
By admin | Published: May 16, 2017 12:48 AM