सोमठाणा येथील जुने गावठाण १०० के.व्ही.चे रोहित्र चार वेळा बदलण्यात आले आहे; परंतु तो वारंवार जळत असल्याने शेतकऱ्यांना शेतात पिकाला पाणी देण्याची समस्या निर्माण झाली होती. एकाच रोहित्रावर हा संपूर्ण लोड असल्याने आता पुन्हा नवीन ट्रान्सफार्मर लावला तर तो जळणार, असे दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली होती. या अगोदर उद्भवलेल्या समस्या चिखलीचे सहायक अभियंता गायकवाड यांच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या होत्या; परंतु ट्रान्सफार्मर लावला तर तो पुन्हा जळणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता एन.डी.माळोदे यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती. दरम्यान, कार्यकारी अभियंता माळोदे यांनी सोमठाणा गाव गाठून रोहित्राची पाहणी केली. याबाबत नवीन पोल टाकून लोड डीव्हाइड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी गावातील समस्या मांडल्या असता मंदिराजवळील जंगलेला व मोडकळीस आलेला पोल व शेतातील वाकलेले पोल वायरींग करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: गावात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्यावतीने कार्यकारी अभियंता मोळोदे व गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरनाईक, राजपूत, भारत वाघमारे, महावितरण सहायक अभियंता डी.जी.गायकवाड, अवचितराव वाघमारे, अविनाश झगरे, छोटू झगरे, सुदर्शन वाघमारे, परमेश्वर झगरे, अंबादास झगरे, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, भागवत झगरे, विठ्ठल झगरे, गणेश झगरे, प्रभाकर झगरे, विजय परिहार, गोटू वाघमारे आदींची उपस्थिती होती.
विजेच्या समस्या सोडविण्यासाठी अभियंत्यांसह ‘स्वाभिमानी’ शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:34 AM