बुलडाणा, दि. 25 - तुम्हाला हव्या असलेल्या रूपात श्री गणेशाची मातीची मूर्ती बनवून तत्काळ विक्री करण्याचा उपक्रम शिरपूर येथील जिल्हा परिषदेवरील शिक्षकाने शुक्रवारी राबविला. ऑर्डर दिल्यानुसार तत्काळ गणेशाची मातीची मूर्ती बनवून ग्राहकांना देण्यात येत होती.
प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीपासून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्यामुळे पर्यावरण रक्षणाकरीता श्री गणेशाच्या मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्ती बाजारात उपलब्ध नसल्यामुळे अनेकांची इच्छा असूनही पीओपीच्याच मूर्तीची स्थापना करावी लागते. मात्र, यावर तोडगा काढत शिरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कलाशिक्षक सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी मातीच्या मूर्ती बनवून विक्री करण्यास सुरूवात केली.
विशेष म्हणजे ते ग्राहकाला ज्या स्वरूपात हवी त्या स्वरूपात श्री गणेशाची मूर्ती हातोहात तत्काळ बनवून देत होते. त्यानंतर ग्राहक सदरमूर्ती खरेदी करीत होता. ग्राहकांना भूर्दंड पडू नये म्हणून मूर्तीचे दरही त्यांनी अल्प ठेवले होते. जशी जशी भाविकांना याबाबत माहिती होत गेली. तसतशी त्यांच्या दुकाना पुढील गर्दी वाढत होती. पर्यावरण रक्षणाचा हेतू साध्य करण्याकरीताच हा उपक्रम राबवित असल्याचे देशमुख यांनी सांगितले.