लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगावात सुपरस्प्रेडरची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यासाठी नगरपालिकेची वेगवेगळी पथके सुपरस्प्रेडरचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. यात दूधविक्रेते, भाजीविक्रेते, पानटपरीचालक, गॅस वितरक यासह वेगवेगळ्या आस्थापनांत काम करणाऱ्या कामगारांचा समावेश असून, आतापर्यंत खामगावातील २६६ जणांची तपासणी करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन तातडीचे प्रयत्न करीत आहे. विभागीय आयुक्तांनी गुरुवारीच याबाबत यंत्रणेला निर्देश दिले होते. दरम्यान सुपरस्प्रेडरच्या याद्या पालिकेच्या पथकाने तयार केल्या असन प्रत्येकालाच कोरोना चाचणी बंधनकारक करता येईल का, यावर प्रशासनाचा विचार सुरू आहे.
कोरोना तपासणी न करणाऱ्यांना दंड करण्याचा विचार! नागरिकांमध्ये केवळ कोरोनाच नाही, तर त्याच्या तपासणीबद्दलही प्रचंड भय आहे. तपासणी केली तर आपण कोरोना पॉझिटिव्ह तर येणार नाही ना, या भयगंडाने अनेक जण तपासणीसाठी पुढेच येत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे सुपरस्प्रेडर स्वत:हून तपासणीसाठी पुढे येतील की नाही, याबाबत शंका आहे. जे सुपरस्प्रेडर स्वत:ची तपासणी करून घेणार नाहीत, त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
कृउबास परिसरातील स्प्रेडरचा प्रतिसाद नाही! कोरोना तपासणीला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कोरोना स्प्रेडरर्संनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. परिणामी, सोमवारी या परिसरात एकाही कोरोना स्प्रेडरची तपासणी केली गेली नाही. यादिवशी आयोजित शिबीर अयशस्वी ठरल्याचा सूत्रांचा दावा आहे.