- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रक्तातील साखर तपासण्यासाठी तपासणी प्रयोगशाळेत गेलेल्या पती-पत्नीच्या हातात एकसारखेच निरीक्षण असलेला अहवाल दिल्याने उभयतांनी प्रयोगशाळेच्या बेफिकिरी वृत्तीचे वाभाडे काढले. यावेळी लागलीच पतीचा अहवाल परत घेत त्यांना निरीक्षणाच्या आकड्यात फरक असलेला अहवाल देण्यात आला. मात्र, आतापर्यंत केलेल्या तपासण्याही अशाच फसवणूक करणाऱ्या असू शकतात, त्यामुळे आरोग्यावर होत असलेला खर्च कोण भरून देणार, असा सवाल दत्तात्रय त्र्यंबक बोंडे यांनी केला आहे. दत्तात्रय बोंडे आणि त्यांची पत्नी रक्तातील साखर तपासण्यासाठी नमुना दिला. अमृत पॅथालाॅजी लेबाॅरेटरीमध्ये त्यांनी जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर रक्त दिले. त्याचा तपासणी अहवाल घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या हातात ७७९ व ७८० कोड असलेला अहवाल देण्यात आला. त्यातील निरीक्षणे पाहिली असता पती-पत्नीच्या रक्तातील घटकांचे प्रमाण दर्शवणारे आकडे दोन्ही अहवालात सारखेच होते. त्यामुळे नेमका कोणता अहवाल खरा आहे, याबाबत त्यांचा संभ्रम झाला.
प्रयोग शाळांमधून सदोष अहवालानुसार डाॅक्टर उपचार करीत आहेत. त्यातून आरोग्याचे तीन तेरा वाजण्यासाेबतच त्यावर खर्चही प्रचंड होत आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी यंत्रणांनी लक्ष द्यावे.- दत्तात्रय बोंडे, खामगाव.
तपासणी अहवाल प्रिंटिंग करताना एकामागे एक असल्याने ही चूक झाली असेल. ती लक्षात आल्यानंतर संबंधितांना नव्याने अहवाल दिला. त्यामुळे आमच्यासाठी विषय तेथेच संपला आहे. - डाँ. संजीव भोपळे, पॅथाॅलाॅजिस्ट, अमृत लेबाॅरेटरी, खामगाव