- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात आरोग्य विभागाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र आता नागरिकांच्या निष्काळजीमुळे डासांची उत्पत्ती होत असल्याने पुन्हा डेंग्यूचा धोका वाढला आहे. गत तीन वर्षात ७८ रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती जागतिक डेंग्यू दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे.डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार एडीस इजिप्टी या डासांच्या मादीपासून होतो. साधारणत: जून ते आॅक्टोबर या कालावधीत याचा जास्त प्रसार होतो. कारण या कालावधीमध्ये पाऊस पडत असल्यामुळे अनुकुल वातावरण असते. हा डास तुलनेने इतर डासांपेक्षा लहान असतो. या आजारावर निश्चित असा औषधोपचार नसल्यामुळे अटकाव करणे हा एकमेव मार्ग आपल्या हातात आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. परिसरात असलेला केरकचरा एकत्रिक करून जाळून नष्ट करणे. डबकी असल्यास ती त्वरी बुजविणे. आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करून स्वच्छ करत कोरडा दिवस पाळणे यासह इतर काही उपाययोजना केल्यास या आजाराला सहजपणे प्रतिबंध घालता येऊ शकतो. जिल्ह्यात या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याने व नागरिकांनी देखील काळजी घेत आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन केल्याने हा आजार आटोक्यात आला होता. २०१७ मधील डेंग्यूच्या रुग्णसंख्येवर नजर टाकल्यास हा आकडा केवळ ४ वर आला होता.मात्र नागरिकांनी आवश्यक त्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने हा धोका वाढला असून २०१८ मध्ये ३६ तर २०१९ मध्ये ३८ असे एकुण तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७८ रुग्णांची भर पडली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी निश्चितच दिलासादायक नसून चिंता वाढविणारी आहे.नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे. डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यावर होते. त्यामुळे स्वत: लक्ष घालून घरातील पाण्याची भांडी स्वच्छ करावी व पाण्यामध्ये डासांच्या अळ्या नसल्याची खात्री करावी. जेणेकरून या आजारापासून बचाव करणे शक्य होईल.- एस. बी. चव्हाण,जिल्हा हिवताप अधिकारी.