समाजातील काही सराईत गुन्हेगार हे चोरी, घरफोडी, फसवणूक असे मालमत्तेचे गुन्हे करतात. हे गुन्हे घडल्यानंतर आरोपी शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतात आणि सुरूच राहतील. तरी गुन्हेगार हे वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करीत असतात म्हणून चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी चिखली पोलिसांनी सकर्त राहून कष्टाने कमावलेल्या मालमत्तांना बाधा पोहोचू नये, याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये रात्री झोपताना दरवाजा उघडा ठेवून झोपू नये, मोटारसायकलला लोखंडी साखळीचे लॉक लावावे, प्रवेशदाराच्या कडीला कुलूप लावून ठेवावे, जेणेकरून एखाद्या शेजारच्या घरात चोर शिरताना आजूबाजूच्या घरांच्या बाहेरून कड्या लावू शकणार नाही व त्यामुळे शेजारी काही आरडाओरड झाल्यास तात्काळ बाहेर येऊन मदत देता येईल, बाहेरगावी जाताना शेजारच्या लोकांना माहिती देऊन जावे व एकमेकांचे फोन नंबर्स माहीत असावेत. घरात जास्त रोख रक्कम किंवा सोन्याचे दागिने ठेवू नये, अंगावर जास्त दागिने घालू नयेत, ते बँकेत लॉकर्समध्ये ठेवावेत. दिवसा अनोळखी व्यक्ती गावात फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. एखाद्या अनोळखी व्यक्तीने पैसे दागिने जवळचे काढून त्यांच्याकडे मागितल्यास अथवा बॅगेमध्ये ठेवण्यास सांगितल्यास असे न करता आपले आसपासचे लोकांना ओरडून अशा लोकांची माहिती द्यावी. नागरिकांनी कोणताही आर्थिक व्यवहार किंवा इतर खरेदी विक्रीमधून मिळालेली मोठी रक्कम घरात न ठेवता लवकरात लवकर बँकेत जमा करावी, असे आवाहन चिखली पोलिसांनी केले आहे.
बेसावधपणाचा गुन्हेगार उचलतात गैरफायदा
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कायमच तत्पर आहे; मात्र, बेसावधपणे नागरिकांकडून काही चुका होतात. त्याचा गैरफायदा गुन्हेगारांकडून घेतला जातो. या पार्श्र्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचना या सहज साध्य व सोप्या पध्दतीच्या असल्याने त्याचे पालन करावे व सर्व नागरिकांनी सतर्क राहून आपल्या मौल्यवान वस्तूंची व त्याहूनही मौल्यवान म्हणजे आपल्या जीवनाची सुरक्षा करावी, असे आवाहन ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी केले आहे.