बुलडाणा, दि. २३- भारताच्या राजकारणात अनेक पक्ष आहेत. बाबासाहेबांच्या जीवनकाळात महात्मा गांधींच्या दबावामुळे पुणे करार करावा लागला. आज घडीला तीच परिस्थिती देशातल्या बौद्ध बांधवांवर लादण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र बौद्ध बांधवांनी कुठल्या पक्षात राहावे त्याला आमचा विरोध नाही; मात्र त्यांनी डॉ. बाबासाहेब यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे पाईक होऊन बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहावे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले. स्थानिक गांधीभवन येथील आयोजित भारतीय बौद्ध महासभेतर्फे २२ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता राजरत्न आंबेडकर उपस्थित जनसमूदायाला संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अशोकराव आंबेडकर यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक प्रा. प्रकाश गवई, आनंद वानखेडे, दिलीपराव जाधव, विश्वनाथ दांडगे यांच्यासह बौद्ध विचारांच्या मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रास् ताविकात आनंद वानखेडे यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. त्यानंतर प्रा. प्रकाश गवई यांनी उपस्थित बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जातीव्यवस्था निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, एसटी, एससी, ओबीसी प्रवर्गाच्या अनुशेष भरती करण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावे, असे सांगितले. राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेनुसार दलित या शब्दाचा उल्लेखच नाही; मात्र इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया भारतातल्या मागासवर्गीय जनतेवरील अत्याचाराविरोधात दलित हा शब्दप्रयोग करतात; मात्र दलित हा शब्द घटनाबाह्य आहे. यामागील कारण आंतरराष्ट्रीयदृष्ट्या चुकीचे असून दलितांवरील अत्याचाराच्या बातम्या ह्या बौद्धांवरील अन्याय-अत्याचार या हेडिंगखाली घेणे आवश्यक आहे; मात्र प्रसारमाध्यमे असा शब्दप्रयोग करीत नाही. भारताचे पंत प्रधान नरेंद्र मोदी हे इतर देशात गेल्यावर मी बौद्ध राष्ट्राचा प्रतिनिधी आहे, असे दाखवून करोडो रुपये त्या देशांमधून भारतात आणतात व बुलेट ट्रेनची मागणी करतात. वास् तविक पाहता भारतातील मीडिया इथल्या दलित अत्याचारांवर दलित म्हणून प्रकाशझोत टाकतो. कारण बौद्ध राष्ट्र हा उल्लेख झाल्यास यांना करोडो रुपयांचा निधी मिळणे दुरा पास्त होते. त्यामुळे इथल्या दलित बांधवांनी स्वत:ची ओळख बौद्ध म्हणून करावी, असेही त्यांनी सांगितले. यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पाईक होऊन बौद्ध महासभेची नोंदणी करून घेऊन समाजाशी एकनिष्ठ आहोत, याचा प्रत्यय द्यावा. बौद्ध महासभेच्या माध्यमातूनच बाबासाहेबांचे भारताला बौद्धमय राष्ट्र करण्याचे स्वप्न साकार होईल. त्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचेही त्यांनी निक्षून सांगितले. यावेळी बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधवांची उपस्थिती होती.
बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहा-राजरत्न आंबेडकर
By admin | Published: October 24, 2016 2:38 AM