बुलडाणा: राजूर घाटात सुमारे सव्वा वर्षाच्या अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू हा मल्टीआॅर्गन फेल्युअरमुळे झाला असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येत आहे. दरम्यान, त्याचा व्हीसेला हा नागपूर येथील फॉरेन्सीक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात आला असून त्यानंतर या पिल्लाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. बुलडाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका सव्वा वर्षाच्या अस्वलाच्या पिल्लाचा तीन नोव्हेंबर राजी मृत्यू झाला होता. दरम्यान, या मृत पिल्लाजवळ त्याची आई सातत्याने येत होती. त्यातून प्रसंगी दुर्घटना होण्याची शक्यता पाहता बुलडाणा आणि मोताळा वनपरीक्षेत्र अधिकार्यांनी या ठिकाणी एक रेस्कू पथकही पाठवले होते. त्यानंतर दुपारी या मृत पिल्लाला ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ठोसर यांनी त्याचे शवविच्छेदन केले होते. त्यामध्ये या पिल्लाचा मृत्यू हा मल्टीआॅर्गन फेल्युअरमुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण हे फॉरेन्सीक लॅबचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे डॉ. ठोसर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. त्यामुळे आता प्रत्यक्षात अहवाल आल्यानंतर अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला ही बाब स्पष्ट होईल. दुसरीकडे मोहेगाव शिवारात ही घटना घडली असून परिसरात मृत अस्वलाची आई सध्या फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे दहशतीचे वातावरण आहे. प्रसंगी ही आक्रमक होण्याची शक्यता पाहता वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सांगितले आहे. वनविभागाचे एक पथक या भागात नजर ठेऊन आहे. परिसरात अस्वलाचे आणखी एक पिल्लू मोहेगाव शिवारात एक पिल्लू मृतावस्थेत आढळले असले तरी आणखी एक पिल्लू या भागात फिरत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे या पिल्लाच्या शोधात मादी अस्वल पुन्हा या भागात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मल्टीआॅर्गन फेल्युअरमुळे अस्वलाच्या पिल्लाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 5:31 PM