बोरखेड(जि. बुलडाणा), दि. २५- परिसरातील पिंगळी शेतशिवारात रविवारी संध्याकाळी अस्वल आढळून आले. यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर तब्बल तीन तास उशिराने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.सोनाळा येथील शेतकरी विजय तुळशीराम अहिर यांचे पिंगळी शिवारात शेत आहे. रविवारी शेतात काम करीत असताना संध्याकाळी ६.१५ वाजताचे सुमारास विजय अहिर यांना शेतातील निंबाच्या झाडावर अस्वल बसले असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती त्यांनी सोनाळा तसेच जळगाव जामोद येथील वनविभागाला दिली. मात्र, तब्बल तीन तासाने सोनाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एम.झेड. काझी व वनविभागाचे पथक घटनास्थळी आले. रात्र असल्याने अस्वल पकडणे शक्य नाही, असे सांगून हे पथक मोकळे झाले. दरम्यान, अस्वल असल्याची माहिती पसरताच शेतात बघ्यांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे याच शिवारात १४ सप्टेंबर रोजी अस्वल आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले होते. अनेकांनी शेतात जाणे बंद केले होते. याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतरसुद्धा वन विभागाला अस्वलास पकडण्यास अपयश आले होते. यानंतर २२ सप्टेंबर रोजी याच परिसरात मृत अस्वलाचे अवयव आढळून आले होते. तसेच याप्रकरणी शेतकर्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वलाचा बंदोबस्त करण्यास वनविभाग अपयशी ठरत असल्याने शेतकर्यांसोबतच शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. तेव्हा वनविभागाच्या कर्मचार्यांनी मुख्यालयी राहून अस्वलाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांकडून केली जात आहे.
पिंगळी शिवारात आढळले अस्वल!
By admin | Published: September 26, 2016 2:42 AM