मोताळा येथील महावितरण कार्यालयातील तंत्रज्ञ अजय ज्ञानेश्वर सातव (२७) यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी व त्यांचा सहकारी कर्मचारी अक्षय वसंत एंडोले (२६) हे दोघे गुरुवारी (दि. ४) मोताळा तालुक्यातील नेहरूनगर येथे शासकीय काम करत होते. दरम्यान, गावातील सुरेश संपत पवार याने लघु दाब वीजवाहिनीवर आकडा टाकून वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या घरात महावितरणचे अधिकृत विद्युत मीटर मिळून आले नाही. दरम्यान, फिर्यादी व सहकारी कर्मचारी हे दोघेजण वीजवाहिनीवरील आकडा काढत असताना, आरोपी सुरेश संपत पवार याने त्यांना शिवीगाळ करून बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा गावात आल्यास हातपाय तोडून टाकण्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी वीज तंत्रज्ञ अजय ज्ञानेश्वर सातव यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी सुरेश संपत पवार (रा. नेहरूनगर) याच्याविरुद्ध कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल जंजाळ करीत आहेत.