लोकमत न्युज नेटवर्क नरवेल : थकीत देयकाच्या वसुलीसाठी पुरवठा खंडित करणाऱ्या वीज कंपनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता नरवेल येथे घडली. याप्रकरणात फिर्यादीवरून आरोपी विश्वनाथ गोविंद इंगळे यांच्यावर एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थकीत देयक असणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी गावात आले. त्यावेळी खांबाबर चढून वीजपुरवठा कापला असता गावातील आरोपी विश्वनाथ गोविंद इंगळे (वय ६५) या आरोपीने कंपनी कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. सोबतच महावितरणचा कर्मचारी सैय्यद तौसिफ सय्यद फिरोज (वय ३४, रा. दसरखेड सबस्टेशन) यास लोखंडी दाताळाने मारून जखमी केले. प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार अनिकेत प्रकाश आकोटकार (२५) यांनी केली दसरखेड एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे.त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एफ. सी. मिर्झा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आर. पी. बोरकर, पहुरकर, नापोका प्रमोद पोलाखरे, प्रवीण पोळ करत आहेत.
वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:20 AM