योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी पांडुरंग रामदास मगर, अनुजा प्रमोद मगर दोघे (रा. देऊळगाव माळी, ता. मेहकर) यांना खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत महाबळेश्वर येथे २० दिवसाचे प्रगतिशील मधपाळ (केंद्रचालक) म्हणून निवासी प्रशिक्षण विनामूल्य देण्यात आले आहे. मध उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना या योजनेतंर्गत ५० टक्के स्वगुंतवणूक व ५० टक्के मंडळ अनुदान या भांडवली स्वरूपात त्यांना प्रत्येकी ५० वसाहतीसह मेलीफेरा मधपेट्या, एक मधयंत्र व इतर मध उद्योग साहित्य असे एकूण १०० मधपेट्यांचे वाटप जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोधीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मधुक्षेत्रीक एस. एम. हाडोळे, तांत्रिक कर्मचारी आर. एम. बिलबिले, औद्योगिक पर्यवेक्षक सचिन इढोळे व गावातील शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी हाडोळे यांनी मधमाशीपालनाविषयी माहिती दिली. किलबिले यांनी शेतकऱ्यांना शेतीपिके, फळपिके यामध्ये १५ ते ४० टक्केपर्यंत परागीभवन होत वाढ होऊन मधमाशा पालन हा शेतीपूरक जोडधंदा असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर यांनी जास्तीत जास्त शेतकरी व लाभार्थी यांनी या व्यवसायाकडे वळून लाभ घेण्याचे आवाहन केले.
मध केंद्र योजनेतंर्गत मिळणार प्रशिक्षण
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेंतर्गत पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रशिक्षणासाठी व उद्योगासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेतंर्गत वैयक्तिक मधपाळांसाठी प्रशिक्षण जिल्ह्यामध्ये कुठेही मिळणार आहे. पात्र अर्जदारांना १० मधपेट्या देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी २८ जुलैची मुदत देण्यात आली आहे.
प्रशिक्षणासाठी अशा आहेत अटी
प्रगतशील मधपाळांसाठी २० दिवस प्रशिक्षण महाबळेश्वर, जि. सातारा येथे मिळणार आहे. तसेच ५० मधपेट्या देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावा व वय २१ वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या नावे किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी. लाभार्थीकडे मधमाशा पालन व प्रजनन, मधोत्पादन याबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. प्रशिक्षणापूर्वी ५० टक्के स्वगुंतवणूक भरणे आवश्यक आहे.