अनिल उंबरकर
शेगाव ( बुलढाणा) : जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांच्या काळात किती फसवणूक केली, ही बाब आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेच्या निमित्ताने देशात परिवर्तनाला सुरुवात झाली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही माहिती दिली. त्यामध्ये केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, याच दिवशी मागे घेतल्याने १९ नाेव्हेंबर हा दिवस किसान दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुका आल्या की भाजपकडून मूळ मुद्यांना बगल दिली जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीआरपीएफच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्याचे काय झाले, हे अद्यापही जनतेसमोर आलेले नाही. अरुणाचल, लद्दाख सीमांमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. त्याबद्दल बोलायलाही ५६ इंच छाती असल्याचा आव आणणारे तयार नाहीत, असे सांगत पटोले यांनी अनेक बाबी आता जनतेच्या लक्षात येत असल्याने परिवर्तन होणार असल्याचे म्हणाले.
काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने आरोप केले जातात. त्याबद्दल कुणीही बोलत नाही. ही दुटप्पी भूमिका असल्याचेही ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पत्र आणि त्यांना मिळणारी ६० रुपये महिना पेंशन कशासाठी होती, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे, विचाराचा प्रतिकार विचारांनी करून देशात लोकशाही असल्याची प्रचीती संबंधितांनी द्यावी, असेही पटोले म्हणाले.