मलकापूर : दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस समजल्या जातो. मात्र कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील बेलाड ग्रामस्थांनी गावाजवळील डम्पिंग ग्राउंड वर दिवाळी साजरी करून शासनाचा निषेध नोंदवला.
मागील दोन महिन्यापासून बेलाड ग्रामस्थांच्या आरोग्यास धोकादायक असलेलं डम्पिंग ग्राऊंड त्वरित हटविण्यात यावे व झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्यांना त्वरित उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी लढाई लढत आहे. याकरिता न. प. प्रशासनाला व तहसीलदारांना वारंवार निवेदने दिली. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.
दिवाळीच्या दिवशी सर्व ग्रामस्थांनी दिवाळी या सणावर बहिष्कार टाकून डंपिंग ग्राउंडवर दिवाळी साजरी केली. या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी सुनील संबारे, श्रीकृष्ण संबारे, इच्छाराम संबारे, राहुल संबारे, दीपक चोखंडे, गणेश दहिभाते, सोमेश्वर संबारे, हनुमान भगत, सागर संबारे, गजानन संबारे, दुर्गेश जंगले, सचिन संबारे, पवन संबारे, अमोल संबारे, मनोज संबारे, गणेश संबारे,अनिल केने, प्रशांत संबारे, निलेश संबारे, शिवाजी केने, अमृत संबारे, रामा संबारे यांनी सहभाग घेतला.
असा दुजाभाव कशासाठी?
नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बेलाड कॉटन मार्केट समोर राहणाऱ्या नाथ जोगी समाजाचे लोक यांना वीजपुरवठा व्हावा याकरिता विद्युत वितरण कंपनीमध्ये दिवाळी साजरी केली. परंतु त्या समाजाच्या लोकांसाठी विद्युत पुरवठा व्हावा हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. डम्पिंग ग्राऊंड हा त्यांच्यासाठी तितकाच गंभीर प्रश्न आहे. नऊ-दहा 2018 ला नगरपरिषद प्रशासनाला डम्पिंग ग्राउंड विरोधात निवेदन देताना नाथ जोगी समाजाचे लोक उपस्थित होते. नाथ जोगी समाजाचे लोक जिथे राहतात त्यांच्या घराच्या 100 मीटर अंतरावरच हे डम्पिंग ग्राऊंड वसवलेलं आहे. नगराध्यक्ष अॅ. हरीश रावळ या प्रकरणाबाबत दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केला.
आरोग्याचा प्रश्नाकडे दुर्लक्ष!
भराडी लोकांसह बेलाड ग्रामस्थ व इतर आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पाच हजार लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतानाही हरीश रावळ गप्प का असाही प्रश्न उपस्थित केला आहे. जोपर्यंत आम्हा बेलाड वाशीयांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कोणताही सण साजरा करणार नाही असे यावेळी ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच येत्या दोन-तीन दिवसाच्या आत प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात विराट एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.