लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोमवारपासून बुलडाणा जिल्हयातील ६७५ शाळांपैकी जवळपास ४०० शाळा सुरू होण्याचे संकेत सुत्रांनी दिले असून ६०५० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी रविवारपर्यंत ३५०० जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. यातील ५६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दरम्यान, अद्यापही उर्वरित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अहवाल मिळण्यास किमान दोन दिवस लागण्याची शक्यता पाहता जिल्ह्यातील शाळा या टप्प्या टप्प्याने सुरू होतील, असे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.ज्या शाळांमधील शिक्षकांचे आरटीपीसीआरचे रिपोर्ट प्राप्त झाले त्या शाळा सोमवारी उघडतील. पण ज्या शाळांमधील शिक्षकांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत त्यांना शासनाच्या निर्देशानुसार साळेत जाण्यास परवानगी नसल्याने त्या साळा एक किंवा दोन दिवस उशिरा उघडणार आहेत. शासनाने अत्यंत सुस्पष्ट अशा सविस्तर मार्गदर्शक सुचना १० नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार दिलेल्या आहेत. त्या परिपत्रकानुसारच जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा आदेश काढलेला आहे. परिणामी एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यातील बहुतांश शाळा या चालू आठवड्यात उघडतील, असे संकेतच सुत्रांनी दिले आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता सोमवारी जवळपास ४०० शाळा सुरू होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली. मात्र नियमित स्वरुपात शाळा सुरळीत हाेण्यासाठी एक आठवडा लागू शकतो. जिल्ह्यातील ९८ टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता पर्यंत यातील ५६ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांची संख्या कमी आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. अशा शिक्षकांना तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत न जाता उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यानंतरच पुढे विहीत कालवधी संपल्यानंतर वैद्यकीय प्रमामपत्र घेवूनच त्यांना शाळेवर रुजू होता येईल.
बुलडाणा जिल्ह्यातील ४०० शाळांची आज घंटा वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:04 PM