आश्रमासारख्या मानवसेवा करणाऱ्या संस्थांची देशाला गरज आहे. मानवाच्या भौतिक व आध्यात्मिक कल्याणासाठी स्वामी विवेकानंदांनी केलेल्या उपदेशाचे अनुसरण या ठिकाणी पाहायला मिळाले. कर्मयोग हा सर्वश्रेष्ठ योग असून जीवसेवेसाठी केलेल्या कर्मयोगानेच परमेश्वराची प्राप्ती होते व कर्मयोगीच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ उपासक असतो. संस्थेच्या सहकार्यानेच परिसरातील वातावरणात पवित्रतेचा सुगंध दरवळतो आहे. ज्या ठिकाणी सेवा त्या ठिकाणी परमेश्वराचा वास असतो, म्हणून कर्मयोग आचरणात आणल्यानेच वातावरण भक्तिमय होते. आश्रमात बालकांवर होणारे संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण असून सदाचारी, स्वावलंबी व संस्कारी बालकेच उद्याच्या देशाच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणार आहेत. देव, देश आणि धर्मासाठी हवी असलेली चारित्र्यसंपन्न पिढी पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून घडत असल्याचे समाधान आहे, असे मत मोडक महाराज यांनी व्यक्त केले. हरिहरतीर्थावरील नयनरम्य बगिचा, गोशाळा व मंदिरे यांना त्यांनी भेट दिली. कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारक व संस्थेच्या इतर सेवा उपक्रमांनाही भेटी दिल्या. त्यांच्या आगमनप्रसंगी प्रवेशव्दारावर पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, आश्रमाचे विश्वस्त शशिकांत बेंदाडे, सुभाष गणगणे, सुनील मिसर तसेच स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
विवेकानंद आश्रमाची आपुलकी, स्वच्छता मनाला भारावणारी- मोडक महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:32 AM