लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाऊनमुळे मोठ्या शहरांमधील उद्योगधंदे पुन्हा एकदा ठप्प झाले आहेत. परिणामी, हाताला काम नसल्याने कामगारांवर खूप मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शहरात उपाशी जगण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास त्यांच्याकडून पसंती देण्यात येत असल्याने बसस्थानकावरील गर्दीत वाढ झाली आहे.मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. यामुळे मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त गेलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. एवढेच नव्हेतर, त्या वेळी वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश होते. त्यामुळे दुहेरी संकट कामगारांसमोर होते. जवळ असलेली सर्व जमा पुंजी संपल्यामुळे शहरात दिवस काढणे त्यांना खूप कठीण होऊन बसले होते. अशा परिस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने त्यांनी आपले गाव जवळ केले. काहींनी तर चक्क पायीच गावाची वाट धरल्याचे पाहायला मिळाले. परप्रांतातील मजुरांचीही हीच अवस्था झाली होती. शेकडो किलोमीटर अंतर कापून ते आपल्या मूळ गावी पोहोचले होते. आता मात्र वाहतूक पूर्णपणे सुरळीत असल्याने वाढत्या रुग्णसंख्येच्या काळातही मोठ्या शहरांमधून बसेस पूर्ण प्रवासीक्षमतेने जिल्ह्यात येत आहेत.
औरंगाबाद मार्गावर सर्वाधिक गर्दीबुलडाणा जिल्ह्यातून औरंगाबाद येथे कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने येथे गेलेले कामगार जिल्ह्यात परतत आहेत. यामुळे या मार्गावर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत औरंगाबाद येथे जाणाऱ्या कामगारांमध्ये बुलडाणा शहरातून जाणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे प्रामुख्याने बुलडाणा-औरंगाबाद या मार्गावरील बसमध्ये गर्दी अधिक होत आहे. जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्यामधून पुणे, मुंबई येथे जाणाऱ्या कामगारांची संख्यादेखील खूप मोठी आहे. यामुळे औरंगाबादनंतर या मार्गावरदेखील गर्दी दिसत आहे.
मागील वर्षी तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉकच्या प्रक्रियेअंतर्गत टप्प्याटप्प्याने सर्व व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे कामाच्या शोधात आम्ही पुन्हा पुण्याकडे धाव घेतली. आता मात्र पुन्हा काम बंद झाल्याने गावाकडे येत आहोत.- विजय राऊत.
गत लॉकडाऊनमुळे पुणे येथे खूप त्रास सहन करावा लागला. कामबंद असल्याने आणि उत्पन्नाचे साधनच नसल्याने उपासमारीची वेळ आली होती. या वेळी पुन्हा तशी वेळ ओढवू नये, याकरिता आतापासूनच गावाची वाट धरली आहे.- शुभम म्हसाळ.
मागील वर्षीच्या तुलनेत या वेळी कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र उपचारानंतर रुग्ण बरे होत असल्याने भीती कमी आहे. तरीदेखील आवश्यक ती खबरदारी घेऊन रेल्वेने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.- शंभुराजे इंगळे.