चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यावर चिखलीत ऑनलाईन सट्टा लावण्यात आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्या आधारावर चिखली येथील संभाजीनगरमधील साहेबराव लावंड यांच्या निवासस्थानी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा छापा टाकला. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशानुसार हा छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी श्याम ज्ञानेश्वर कुसाळकर, अनिकेत दिलीप इंगळे, स्वप्निल भगवान जाधव, प्रदीप विजय सोळंके सर्व राहणार चिखली यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, आठ मोबाईल, तीन दुचाकी असा दोन लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एपीआय नागेश कुमार चतरकर, पीएसआय नीलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, नायक पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव, दीपक पवार, विजय सोनवणे, संभाजी असोलकर, पंकज मेहेर यांनी केली. अटक आरोपींना नंतर चिखली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची नंतर जामिनावर मुक्तता केली.
चिखलीत आयपीएलच्या सामन्यावर सट्टेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:33 AM