१४ फेब्रुवारीला जगभरात 'व्हॅलेेन्टाईन डे' साजरा केला जातो. अनेकजण आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी तर प्रेमीयुगूल हा दिवस एकत्र घालवत नाते घट्ट करण्यासाठी एकमेकांना भेटत असतात. मात्र, या पाश्चात्त्य संस्कृतीमुळे मुली व तरुणींच्या छेडखानीचे प्रकार वाढले आहेत. शहरात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, कॉफी शॉप, बसस्थानक आदी परिसरात अनेक भामटे मुलींच्या मागावर असतात. टिंगल-टवाळी करणे, शेरेबाजी करणे आदी प्रकार वाढीस लागले आहेत. अनेकवेळा टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होते. सोबतच बदनामीच्या भीतीने त्या वाच्यता करत नाही. दरम्यान, शिवसेनेचा पूर्वीपासूनच ‘व्हॅलेन्टाईन डे ला विरोध आहे. या पृष्ठभूमीवर तालुका प्रमुख कपिल खेडेकर यांनी चिखलीत कुठेही जर 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी कोणी एकत्र दिसले, तर त्याने मार खायला तयार राहावे, असा इशारा दिला आहे. व्हॅलेेन्टाईन डे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या संस्कृतीचा अशाप्रकारे नाश होताना पाहू शकत नाही. या दिवशी काहीजण तरुणींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. असे लोक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दिवशी शहरात ठिकठिकाणी शिवसैनिकांना तैनात करण्यात येणार आहे. तथापि यापुढेही छेडखानीविरोधात शिवसेना भक्कमपणे तरुणी व त्यांच्या पालकांच्या पाठीशी उभे राहणार असून पालकांनी अशा प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी नि:संकोचपणे शिवसैनिकांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यासह संबंधित रोडरोमिओंचा योग्य बंदोबस्त करण्याचे, आवाहन कपिल खेडेकर यांनी केले आहे. सोबतच जो कोणी व्हॅलेेन्टाईन डे साजरा करेल, त्याला चोप देण्यात येईल, अशी खुली धमकीच शिवसेनेने दिली आहे.
खबरदार...मुलींची छेड काढलीत तर जागीच चोप देऊ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:34 AM