साप आढळला तर...
आपल्याला कुठे साप आढळला तर घबरून न जाता स्तब्ध उभे राहावे. त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी जवळची एखादी वस्तू बाजूला फेकल्यास त्या वस्तूकडे सापाचे लक्ष केंद्रित होताच तुम्ही बाजूला जावे.
साप घरात आल्यास घाबरू नका. शांत राहा. त्याला न मारता जाणकार सर्पमित्राला बोलवा.
सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबून त्यावर लक्ष ठेवा. लहान मुले, पाळीव प्राण्यांना त्यापासून लांब ठेवा. सापाजवळ जाणे, फोटो काढणे, असे करू नये.
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
नाग : हा दुर्मिळ साप आहे. हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याच्या विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार असा हा साप लांबीला पाच ते साडेपाच मीटर असू शकतो.
मण्यार : मण्यार किंवा मणेर ही चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. साधा मण्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी जंगले जास्त पसंत करतो. याचा रंग पोलादी निळा असून अंगावर पांढरे खवले असतात.
घोणस : घोणसाचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उबवतो व पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर बाहेर काढतो. त्यामुळे कित्येकांचा असा अपसमज आहे, की घोणस सस्तन प्राण्यांप्रमाणे पिल्लांना जन्माला घालतात. घोणस चावल्यानंतर जखमेभोवती कोणत्याही प्रकारची पट्टी लावू नये; असे केल्यास रक्त साखळून चावलेला भाग कायमचा निकामी होण्याची शक्यता असते.
फुरसे : हा विषारी साप जवळजवळ सगळीकडे आढळतो. बहुधा मैदानी प्रदेशात जरी तो राहत असला, तरी १ हजार ८२९ मी. किंवा त्यापेक्षाही जास्त उंचीवर तो आढळला आहे. ओसाड व रेताड प्रदेश आणि खडकाळ डोंगराळ भाग या ठिकाणी तो राहतो; दाट जंगलात मात्र तो नसतो.
साप चावला तर...
साप चावल्यावर, ज्या जागी सापाने दंश केला, त्या जागी काळे -निळे होते. साप चावला तर त्यावर काही प्राथमिक उपचार करू शकतो, जसे की, त्या माणसाला जेथे साप चावला आहे त्याच्या बाजूला पटकन कापडाचा तुकडा बांधावा, जेणेकरून ते विष शरीरात अजून कुठे भिनू नये. जमल्यास त्या व्यक्तीला त्वरित दवाखान्यात घेऊन जावे.
साप आढळला तर सापाजवळ जाणे, फोटो काढणे, असे करू नये. त्वरित जवळच्या सर्पमित्राला माहिती द्यावी. मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो. अशा सापांपासून सावध राहावे.
नीलेश गुजर, सर्पमित्र.