खामगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्यामुळेच आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात झाली. त्यांचे बोट धरूनच राजकारणात आलो. आमदार... खासदार आणि केंद्रीय मंत्री झालो, अशी प्राजंळ कबुली मनुष्यबळ विकास, संचारव माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी 30 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. बुधवारी प्रथमच त्यांचे अकोला येथे आगमन झाले. त्यानंतर लगेचच गुरूवारी सांयकाळी त्यांनी लोकनेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी ना. धोत्रे यांनी श्रीमती सुनिताताई फुंडकर, आ. अॅड. आकाश फुंडकर, सागर फुंडकर यांच्याशी पारिवारिक चर्चा केली. त्यानंतर फुंडकर परिवार आणि भाजप पदाधिकाºयांनी ना. धोत्रे यांचा सत्कार केला. याप्रसंगी पत्नी सुहासिनीताई धोत्रे देखील उपस्थित होत्या. सत्काराला उत्तर देताना ना. धोत्रे यांनी त्यांचे राजकीय गुरू आणि भाजप नेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. स्व. भाऊसाहेब फुंडकर, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सारख्या नेत्यांच्या परिश्रमामुळे भाजपला अच्छे दिन आले. भाऊसाहेबांच्या नेतृत्वात खूपकाही शिकायला मिळाले. आज त्यांच्या आशीवार्दामुळेच केंद्रीय मंत्री झालो; या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे. मात्र, सामान्य कायकर्ता मोठा झाल्याचे, भारतीय जनता पक्षाला मिळालेले मोठे यश पाहण्यासाठी स्व. भाऊसाहेब नाहीत. ही एकच खंत असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी ना. धोत्रे यांनी खामगाव नगर पालिका आणि भाजप कार्यालयालाही भेट दिली.