लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मनसेच्यावतीने म्हशींना दुग्धाभिषेक तर जनावरांना भाजीपाला खाऊ घालून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला उत्पन्न खर्चावर आधारित भाव मिळालेच पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी १ जून पासून राज्यभर शेतकरी संपावर गेले आहेत. शेतकऱ्यांच्या संपाला मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी कार्यकर्त्यांसह शहरातील लोणार वेस येथे म्हशींना दुग्धाभिषेक तर इतर जनावरांना भाजीपाला खायला देत आगळेवेगळे आंदोलन केले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव, विजय काटकर, सुधीर रायते, मारोती मुळे, परमेश्वर मानघाले, विनोद मानघाले, संजय जाधव, किसन मानघाले, राजेश बोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.