भंडारा - वनाधिकाऱ्यांना धक्काबुक्कीसह शासकीय कामात अडथळा आणून वाळूने भरलेला ट्रॅक्टर पळविले प्रकरणी दोष सिद्धतेनंतर दोन आरोपीतांना दोन वर्ष कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा २१ फेब्रुवारी रोजी अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय पी. एस. खुने यांनी सुनावली आहे. शिक्षा झालेल्यांचे नाव मोसम हरीभाऊ मोहरकर (२४) अमिरराज उर्फ अभिराज जयपाल डोंगरे (२५) दोन्ही रा. खमारी बुट्टी, असे आहे.
कारधा पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय पी. एस. खुने यांचे न्यायालयात खटला चालविला गेला. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता विश्वास तवले यांनी प्रकरण गांभीर्याने घेत आरोपीतांविरुद्ध साक्षपुरावे गोळा केले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार सुकरु वल्के यांनी वेळोवेळी कामकाजात मदत केली. न्यायालयाने मोसम मोहरकर व अमिरराज उर्फ अभिराज डोंगरे यांना कलम ३५३, ३७९, ५०६ भादंवी अन्वये दोषी ठरवून २ वर्ष कारावास व २ हजार रुपये आर्थीक दंडाची तसेच दंड न भरल्यास दोन महीन्याचा साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता विश्वास तवले यांनी कामकाज सांभाळले तर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अशोक बागुल, कारधा ठाणेदार गणेश पिसाळ यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार सुकरु वल्के यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून कामकाज केले.
वडेगाव (खमारी) रेती घाटावरील घटनाभंडारा वनपरिक्षेत्राधिकारी विवेक भाष्करराव राजुरकर १६ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता खमारी जवळी वडेगाव (खमारी) रेती घाट येथे सहकाऱ्यांसह वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्तीच्या कारवाईकरीता गेले होते. त्यावेळी आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमा करुन वनाधिकाऱ्यांच्या ताब्यातील वाळूने भरलेला ट्रॅक्टर जमा करण्यास अटकाव केला. वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर यांची कॉलर पकडून ढकलढुकल केले. तसेच अश्लिल शिविगाळी करुन ताब्यातील ट्रॅक्टर त्यांचे विना परवानगीने पळवून नेले. प्रकरणाची तक्रार पोलिस ठाणे कारधा येथे देण्यात आली होती.