Bharat Jodo Yatra: देशासाठी राहुल गांधी बनताहेत 'आश्वासक' चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:17 PM2022-11-22T17:17:11+5:302022-11-22T17:23:23+5:30
या यात्रेचा काँग्रेसला काही राजकीय फायदा होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यात्रा सुरू झाल्यापासून उसळी घेत आहे. त्याचे उत्तर आजच लगेच काही मिळण्याची शक्यता धूसर आहे.
विश्वास पाटील
जलंब (जि. बुलडाणा) : भाजपने सोशल मीडियावर उभी केलेली बदनामीकारक प्रतिमा ते आता सर्वसामान्यांना आश्वासक वाटणारा नेता असे प्रतिमा संवर्धन हेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मोठे फलित असल्याचे चित्र या यात्रेत सहभागी झाल्यानंतर जाणवले.
ही यात्रा जशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी आहे, तशीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील स्पेसलाही बळ देणारी आहे. सगळेच काही वाहून गेलेले नाही... विरोधात कोणी तरी उभा राहत आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यात यात्रा कमालीची यशस्वी होत असल्याचे दिसले.
यात्रा रोज सकाळी सहा वाजता सुरू होते. शेगावला शनिवारी जेव्हा ती सुरू झाली तेव्हा मार्केट यार्डसमोरील रस्ता लोकांनी फुलला होता. पहाटेची बोचरी थंडी होती, परंतु लोकांचा उत्साह त्या थंडीला मागे सारणारा होता. त्यादिवशी इंदिरा गांधींची जयंती असल्याने महिलांना यात्रेत प्राधान्य देण्यात येणार होते. त्यामुळे अर्थातच महिलांची संख्याही लक्षणीय होती.
सकाळी राष्ट्रगीत झाले आणि राहुल गांधी झपाझप पावले टाकत चालू लागले. जो मार्ग होता तो तसा आडवळणाचा होता. शेतवडीतून जाणारा... दोन्ही बाजूला कापूस, तुरीचे पीक होते. गावागावांमधील वातावरण भारावून टाकणारे होते. लोकांनी दारात रांगोळ्या काढल्या होत्या. महिला आरती घेऊन ओवाळत होत्या. अनेक घरांच्या गच्चीवरून लोक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करताना दिसले. ‘नफरत छोडो... भारत जोडो’चा नारा आसमंतात घुमत होता. यात्रेत सहभागी झालेले लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले... गाड्या भरून आणलेले भाडोत्री कार्यकर्ते त्यात कुठेच नव्हते.
कोणी तरी आपल्या जीवनातील दु:ख, अडचणी कमी करण्यासाठी चार पावले चालत आहे, त्याला आपण साथ दिली पाहिजे हीच भावना सहभागी झालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. शाळकरी मुले-मुली वेशीवर थांबून ‘नफरत छोडो... भारत जोडो’ अशा घोषणा मुठी आवळून देत होती. हे चित्र फार आशादायी होते. जलंबमध्ये एक शेतकरी भेटले. ते सांगत होते, ‘पंतप्रधान होण्याची लायकी असणारा माणूस आमच्या गावात आला आहे. त्याच्या पायाला आमच्या गावची माती लागत आहे हे आमच्या गावचे भाग्य आहे. म्हणूनच सारा गाव यात्रेच्या स्वागतासाठी गेले तीन दिवस झटत आहे.’ यात्रेच्या मार्गावरील हे प्रातिनिधीक चित्र होते.
या यात्रेत समाजाच्या सर्वच स्तरांतील लोक दिसत होते. काँग्रेस कार्यकर्त्यापासून ते साहित्यिक, पर्यावरणप्रेमी, समाजवादी, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, डाव्या चळवळीतील आणखी बरेच कोणी... दलित, मुस्लीम, महिला, विद्यार्थी, कामगार ते शेतकरी असेही बरेच समाजघटक त्यात चालताना दिसले. अगदी दहा वर्षांच्या मुलांपासून ते पंचाहत्तरी पार केलेल्या व्यक्तींपर्यंत लोक व्यक्तिगत आजारपण, प्रश्न, अडचणी बाजूला ठेवून या यात्रेत बदलाच्या आशेने सहभागी होत आहेत.
राहुल गांधी यातील अनेकांना शांतपणे भेटताना दिसले. लोकांशी संवाद साधताना, त्यांचे प्रश्न, भावना जाणून घेत होते. भारत जाणून घेण्यासाठीची धडपड त्यातून प्रतित होत होती. सुरक्षा यंत्रणांचा गराडा असतानाही लोक त्यांना भेटण्यासाठी आटापिटा करत होते.
नव्या बदलाची पायाभरणीच...
या यात्रेचा काँग्रेसला काही राजकीय फायदा होईल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यात्रा सुरू झाल्यापासून उसळी घेत आहे. त्याचे उत्तर आजच लगेच काही मिळण्याची शक्यता धूसर आहे. परंतु, भाजप व मोदी यांच्या विरोधातील नेतृत्व म्हणून लोक त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. त्या अंगाने त्यांचे व्यक्तिमत्त्वही आकार घेत असल्याचे चित्र यात्रेतील अनुभवातून ठळक झाले. भारत जोडण्याची ही यात्रा मुख्यत: माणूस जोडण्याची यात्रा आहे. दुभंगलेला समाज जोडण्याची यात्रा आहे, असाच माहौल यात्रेत दिसत आहे. लोकांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास वाटणे ही देशाच्या भावी राजकारणाच्या दृष्टीने नव्या बदलाची पायाभरणीच म्हणायला हवी.