खामगाव: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना रविवारी मानवंदना देण्यात आली. मध्यरात्रीच बौद्ध अनुयायी आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांनी नतमस्तक होऊन बाबासाहेबांप्रति आपली श्रद्धा व्यक्त केली.
भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सामाजिक मंडळांकडून विविध कार्यक्रम पार पडले. महिला मंडळाकडून रात्रीच पाळणा गीत गात, भीमजयंती साजरी केली. शहर आणि शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दितील प्रमुख ०९ मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली. तर तायडे कॉलनी भागातील तीन मंडळांसह काही मंडळांनी सकाळीच आपआपल्या भागात मिरवणुकीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर सायंकाळी प्रमुख मिरवणुकीत ही मंडळे सहभागी झालीत.
सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीला सुरूवातभारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त दुपारी ४:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भीम जयंतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत शहर पोलीस स्टेशन हद्दीतील ०६ मंडळांनी सहभाग नोंदविला. यामध्ये बाळापूर फैलातील अनुक्रमे अशोक क्रीडा मंडळ, भीमशक्ती क्रीडा मंडळ, सम्राट क्रीडा मंडळ या तीन मंडळाचा समावेश होता. त्याचवेळी शंकर नगरातील समता क्रीडा मंडळ, सम्राट क्रीडा मंडळ हरिफैल आणि तथागत बहुउद्देशिय क्रीडा मंडळ, हिरानगर ही मंडळे सहभागी झालीत. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दाळफैलातील अशोक क्रीडा मंडळ पंचशील क्रीडा मंडळ ही दोन मंडळे आणि जुनाफैलातील सिध्दार्थ क्रीडा मंडळाचा मिरवणुकीत सहभागी होती.
आबालवृध्दांची मिरवणुकीत हजेरी...
भीमजयंतीचा उत्साह रविवारी पहाटेपासूनच शिगेला पोहोचला होता. सकाळी वंदन तर सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होत अबालवृद्धांसह मातृशक्तीनेही ठेका धरत बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.