खामगाव: अध्यात्माला सामाजिक कार्याची सांगड घालत ऋणानुबंधाचे नातं जोडणाºया आध्यात्मिक संत भय्यूजी महाराजांच्या स्मृतीचे समाधी मंदिराद्वारे जतन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी भैय्यूजी महाराजांची अस्थिकलश यात्रा २५ जूनला विदर्भात दाखल होईल.
मध्यप्रदेशातील इंदूरनंतर पश्चिम विदर्भातील खामगाव येथे प.पू. भैय्यूजी महाराजांचा सर्वातमोठा आश्रम आहे. सन २००३ साली मुहूर्तमेढ रोवलेले महासिध्दपीठ ऋषीसंकुल सन २००५ मध्ये पूर्णत्वास आले. १ मे २००५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते श्री. सदगुरू धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्ट इंदौर, शाखा खामगाव (ऋषी संकुल)चे भूमिपूजन झाले. या संकुलाच्या स्थापनेनंतर प.पू.भय्युजी महाराजांचं खामगावशी घट्ट नातं जोडल्या गेलं. या आश्रमात त्यांचे नियमित येणे जाणे असायचे. खामगाव आणि परिसरातील सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ ऋषीसंकुलमध्येच रोवल्या गेली. त्यामुळे संत भय्युजी महाराजांनी स्थापन केलेल्या ऋषीसंकुलातील प्रत्येक वारशासोबतच महाराजांच्या स्मृतीही जतन करण्याचा संकल्प त्यांच्या भक्तांनी केला आहे. त्याअनुषंगाने ऋषीसंकुलात भय्युजी महाराजांची समाधी असेल. इंदोर नंतर केवळ खामगावातील ऋषिसंकुलात महाराजांची समाधी राहील. ऋषीसंकुलात जागा निश्चिती आणि समाधीच्या डिझाईनसंदर्भात गुरूबंधू आणि सूर्योदय परिवारातील सदस्यांची बैठक २५ जून रोजी ऋषीसंकुल येथे पार पडणार आहे.
अस्थिकलश यात्रा प्रत्येक जिल्ह्यात!
१२ जून रोजी अकाली निधन झालेल्या प.पू. महाराजांचा २१ जून रोजी इंदोर येथे दशक्रीया विधी पार पडणार आहे. २४ जून रोजी भैय्युजी महाराजांची तेरवी पार पडणार असून, सूर्योदय परिवारातील सदस्यांची बैठकही पार पडणार आहे. त्यानंतर २५ जूनला अस्थिकलश यात्रेला प्रारंभ होईल. ही कलश यात्रा पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यासह विदर्भातील नागपूर आणि प्रत्येक जिल्ह्यात जाईल.
ऋषिसंकुल एक आध्यात्मिक पीठ!
भय्युजी महाराजांनी महासिध्द पीठ ऋषिसंकुल येथे विविध देवतेच्या मंदिरांसोबतच मराठी मनाच्या शौर्याचा इतिहासाची प्रेरणा असलेल्या राजे संभाजीचे स्मारकही निर्माण केले आहे. त्यामुळे खामगाव शहराचा धार्मिक वसा म्हणून अल्पावधीत पुढे आहे. या संकुलात श्री गणपती, श्री शेषनाग, श्री हनुमान, श्री कालिका, श्री महादेव, श्री गुरूदेव दत्त, सिध्द औदुंबर, माता अन्नपुर्णा, संत गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री नवनाथ धुनी, श्री काल भैरव मंदिरासोबतच शनी मंदिरही निर्माण केले. या ठिकाणी भय्यूजी महाराजांची गादी विराजीत आहे. आता या संकुलात भैय्युजी महाराजांच्या समाधी मंदिराची भर पडणार आहे. विदर्भातील गुरूबंधूसाठी तसेच भाविकांसाठी एक सिध्दपीठ म्हणून ऋषिसंकुल आगामी काळात पुढे येईल.
सामाजिक वारसा म्हणूनही ओळख!
विज्ञानाला अध्यात्माची जोड देत अनेक सामाजिक प्रकल्पाची मुहूर्तमेढ ऋषीसंकुलातून रोवल्या जात होती. विधायक कार्याला हातभार म्हणून अनेक हात समोर येत होते. दरम्यान, सूर्योदय पारधी समाज आश्रमशाळेच्या माध्यमातून फासे पारधी समाजातील अनेक मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात आलीत. सामुहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून महाराजांनी अनेकांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे परिसरातील गरीब, कष्टकरी आणि आत्महत्या ग्रस्त शेतकºयांसाठी मोठा आधार म्हणून ऋषीसंकुल नावारूपाला आले आहे.
प.पू. भैय्यूजी महाराजांचे खामगावशी अतूट नाते आहे. महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी ऋषिसंकुल येथे महाराजांची समाधी स्थापित केली जाईल. यासंदर्भात सूर्योदय परिवारातील सदस्यांसोबतच गुरूबंधूची बैठक होईल.
- एन.टी. देशमुख, सूर्योदय परिवार, खामगाव.