बुलडाणा : अनादिकाळापासून जेव्हा प्रचार व प्रसाराचे कोणतेही साधन नव्हते तेव्हा राजे - महाराजांच्या दरबारात कलेला मानाचे स्थान होते, कलेला लोकाश्रय होता, तीच परंपरा कलावंतांनी जोपासली आणि आज कलेला राजश्रय मिळाला. भारूड, गोंधळी, पोतराज, पोवाडे, कीर्तन आणि नृत्यकलेच्या माध्यमातून आजही खेडोपाडी कलावंत समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत, कला एक साधना आहे, ती मिळविण्यासाठी तपश्चर्या, अभ्यास, ज्ञान व तसा गुण लागतो. याच कलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम कलावंत अविरतपणे करीत आहेत. असे असताना शासनाने कलावंतांना डावलून भिकार्यांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्याची गरज का भासली? असा सवाल लोक कलावंतांनी उपस्थित केला. ह्यलोकमतह्ण जिल्हा कार्यालयात सोमवारी आयोजित परिचर्चेत कलेच्या क्षेत्रातील मान्यवरांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर आपले प्रखर मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली छबी देशभरातील लोकांसमोर उभी केली, त्यावेळी तज्ज्ञ व अभ्यासू आणि विद्वान लोकांचा वापर केला तर, गुजरात राज्याचा केलेला विकास देशभरात सांगताना अमिताभ बच्चनसारख्या ज्येष्ठ कलावंतांचा वापर मोदींना करावा लागला. मग शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोदीजींना भिकारीच का आठवले? असा प्रश्न उपस्थित करून शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी भिकार्यांचा वापर करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार असल्याचेही कलावंतांनी मांडले. या परिचर्चेमध्ये शाहीर ए ओ बावस्कर, शाहीर नवृत्ती घोंगटे, धोंडू खराटे, डी. आर इंगळे, विजय सोनुने, वासुदेव देशपांडे यांनी परिचर्चेत सहभाग घेतला.
भिका-यांना काम अन् कलावंत भिकेला!
By admin | Published: August 10, 2015 11:29 PM